विशेष प्रतिनिधी
पुणे : निर्मल वारीसाठी तब्बल ३ हजार ६०० फिरते शौचालये वापरण्यात येत असून, आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात अतिरिक्त दोन हजार शौचालये बसविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाकडून २६ हजार सार्वजनिक शौचालयेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गेली १० वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा स्वच्छता यज्ञ अविरत चालू ठेवला आहे. ज्यामुळे वारीमार्गातील गावांतील अस्वच्छता ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. Nirmal Wari
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला पायी चालत जातात. पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांना सुविधा नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागत होते. ज्यामुळे अस्वच्छता व्हायची. यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेने पुढाकार घेत निर्मल वारीला सुरवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा असलेली ही वारी सुखरूप पार पडावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि ज्या गावातून वारी जाते तिथे अनारोग्य होऊ नये. यासाठी २०१५ पासून निर्मल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पाहत वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. आधुनिक काळात आता वारी खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या निर्मल झाली आहे.
निर्मल वारीचे मुख्य संयोजक संदीप जाधव सांगतात, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू संत तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका यांच्या पालख्यांसोबत राज्य शासनाने फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत आहे.
शेकडो कार्यकर्ते सहभागी
चारही संतांच्या पालखी सोहळ्यात अगदी प्रस्थानापासूनच निर्मलवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोगचे हजारो कार्यकर्ते कार्यरत आहेत. २७ कार्यकर्ते पालखी काळात पूर्णवेळ नियोजन करत आहेत. निर्मल वारीचे मुख्य संयोजक जाधव यांच्यासह संतोष दाभाडे, सहसंयोजक अविनाश भेगडे, माऊलींच्या पालखी मार्गाचे प्रमुख भूषण सोनवणे, सह प्रमुख मंदार लोंबर, तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे प्रमुख विशाल वेदपाठक, सहप्रमुख नितिन बारणे, तर पंढरपूरात स्वानंद देशमाने हे प्रमुख म्हणून तर साहिल शर्मा सहप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच वाखरी मुक्कामी विनय हडवळे, आशिष गौड, निखिल घोरपडे, प्रसन्न पवार, जयदीप खापरे, सतीश नागरगोजे आदि कार्यकर्ते सहभागी आहे. तसेच प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रा. स्व. संघाच्या महाविद्यालयीन विभागाचे स्वयंसेवक आणि समाजातील कार्यकर्ते ५० ते ६० च्या संख्येने व्यवस्थेसाठी जात आहेत. तिथे पाणी, विज, स्वच्छता आदी व्यवस्थात्मक कामे आणि वारकऱ्यांच्या जागृतीचे कार्य करत आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली. सोलापूर येथील विठ्ठल एज्युकेशन संस्था, हिंदू एकता आंदोलन, सिंहगर्जना पथक आदींचे देखिल सहकार्य लाभत आहे.
पंढरपूर एकादशीसाठी सज्ज
आषाढी एकादशीला पंढरपूरात बारा /तेरा लाख वारकरी येतात. त्यामुळे पूर्वी वाळवंटात अत्यंत दुर्गंधी पसरली जात होती. आता मात्र हे प्रमाण ८५ टक्क्यांनी कमी झाल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, “निर्मल वारीच्या माध्यमातून यंदा दोन हजार आणि स्थानिक प्रशासनाकडून २६ हजार सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांची जागृती आणि स्वच्छता करण्याचे कार्य निर्मल वारीतून होत असून, तीन दिवस तिथे हे कार्य केले जाईल.” अजूनही ही स्वच्छता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, लोकसहभागातून हे नक्की शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालखी सोहळ्यातील फिरती शौचालये
– संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज : १८०० – जगदगुरू संत तुकाराम महाराज : १२०० – संत निवृत्तीनाथ महाराज : ३०० – संत सोपानकाका : ३०० – पंढरपूर : २०००
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App