नाशिक : लावणी ते चपटी; “पवार संस्कारित” राष्ट्रवाद्यांनी केली महाराष्ट्रात सांस्कृतिक राजकीय “क्रांती”!!, असं म्हणायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तणुकीमुळे आली. NCP
दिवाळीच्या दिवसांत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अशी काही सांस्कृतिक आणि राजकीय मुक्ताफळे महाराष्ट्रात उधळली, की त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला तोंडात बोटे घालावी लागली. NCP
– नागपूर मध्ये लावणी
अजित पवारांनी दोनच महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पोस्टर समोर प्रोफेशनल डान्सरने लावणीचा बार उडवून दिला. दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे तिने बारा वाजविले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घेरले. पवार संस्कारित पवार कन्या सुप्रिया सुळे यांनी अरे बापरे हे काय चाललेय, म्हणून कानावर हात ठेवले. या सगळ्या प्रकारात अजितदादांच्या राष्ट्रवादीची सगळ्यांनी खिल्ली उडवली, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिथले शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी लावणीचा बार उडविल्याचे समर्थन केले. म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून आपली राजकीय लाज राखायचा प्रयत्न केला पण जी काही राजकीय अब्रू जायची होती, ती गेलीच.
– हवी त्याला द्या चपटी
पण नागपूर मधली ही घटना कमी पडली म्हणून की काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यावर कडी केली. एक वेळ लावणी परवडली, असे म्हणायची वेळ आणली. कारण प्रकाश सोळंके यांनी डायरेक्ट “चपटीच” बाहेर काढली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे जोरदार भाषण ठोकताना प्रकाश सोळंके यांनी कुणाला “चपटी” (गावठी दारूची बाटली) द्यावी लागते, कुणाला कोंबडे कापावे लागते, कुणाला बकरी कापावे लागते, ते सगळे करा. त्यात तुम्ही एक्सपर्ट आहात, पण निवडणुकीच्या मोसमात तुम्ही माझ्याबरोबर राहा, असे आवाहन केले. समोरचा 100 रुपये खर्च करणार असेल तर तुमची पण 100 रुपये खर्च करायची तयारी पाहिजे. तुमच्याकडे “दारू” गोळा तयार पाहिजे, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
प्रकाश सोळंके यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सगळीकडे जोरदार व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृतीच खरी चपटी आणि कोंबडे + बकरे कापायची आहे, तीच प्रकाश सोळंके यांच्या तोंडून बाहेर आली, असे शरसंधान अनेकांनी सोशल मीडियावरून साधले. नागपूरच्या लावणी प्रकरणाने आधीच अजितदादांच्या राष्ट्रवादीची गोची झाली होती, ती प्रकाश सोळंके यांच्या भाषणामुळे अधिक गहिरी झाली.
पवार संस्कारित राष्ट्रवाद्यांनी “लावणी ते चपटी” अशी महाराष्ट्रात सांस्कृतिक राजकीय “क्रांती” घडवून आणली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App