विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज, औरंगजेब ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या जी जावई शोधात्मक मते व्यक्त करत आहेत, ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता 2022 मध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा 2004 च्या वळणावर आली आहे. सन 2004 नंतर तब्बल 18 वर्षे उलटून गेली आहेत. 18 वर्षांनी म्हणजे 2023 च्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा धोक्याचा काळ दाखवून दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, छगन भुजबळ हे एका पाठोपाठ एक वादग्रस्त विधान करत चालले आहेत. अशीच विधाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 2004 च्या आधी केली होती. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत. पण ते धर्मवीर कधीच नव्हते, असे वक्तव्य अजितदादांनी विधानसभेत केल्यानंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ उठले. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र अजितदादांची पाठराखण करताना अधिक आक्रमक होत अनेक वादग्रस्त विधाने केली.
जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब हा क्रूर कर्म नव्हता. हिंदू द्वेष्टा तर मुळीच नव्हता, असा जावई शोध लावला आहे. अमोल मिटकरींनी सुद्धा ब्रिगेडी इतिहासाचा दाखला देत संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचा दावा केला आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी या दाव्यांना त्यांच्या इतिहासाच्या आधारे दुजोरा दिला आहे.
छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक कोणी ठरवले?? ते फक्त ब्राह्मणांचे प्रतिपालक होते का?? त्यांच्या सैन्यांमध्ये कुणबी, माळी, साळी सगळ्या जातीचे लोक होते. मग ते फक्त ब्राह्मण आणि गाईंचे प्रतिपालक कोणी ठरवले अर्थात मी हे सगळ्या ब्राह्मण समाजाविरुद्ध बोलत नाही. पण त्यावेळी ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, असे छगन भुजबळ म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचा विषय तापलेला असताना छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बिरूदाविषयी शंका उपस्थित करून पुन्हा एकदा जुना वाद नव्याने उत्पन्न केला आहे.
2004 मध्ये पुण्याच्या भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला करण्यापूर्वी जेम्स लेन प्रकरणात असेच राजकीय वादळ निर्माण करण्यात आले होते अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांवर द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात बदनामीकारक मजकूर छापला होता. त्याचा संबंध संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भांडारकर संस्थेची जोडून भांडारकर संस्थेवर हल्ला चढवला होता. त्यावेळी एक मोठे जातीय वादळ उठविण्यात आले होते. त्याचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत त्यावेळी ७२ जागा जिंकून काँग्रेस पेक्षा मोठा पक्ष ठरली होती. अर्थात तरीही त्या पक्षाला त्यावेळी मुख्यमंत्रीपद खेचून घेता आले नव्हते.
आता 18 वर्षांनंतर अशाच प्रकारचे जातीय वादळ उठवणारी वक्तव्य अजितदादा ते छगन भुजबळ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी केलेली दिसत आहेत.
अर्थात 2004 आणि 2023 मधला फरक असा की 2004 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेना भाजप पेक्षा तुलनेने शक्तिमान असल्याने त्यांना तेवढ्या प्रखर विरोध होऊ शकला नव्हता. 2023 मध्ये मात्र महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असताना हिंदुत्ववादी संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा अधिक प्रबळ दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जरी 2004 च्या वळणावर गेली असली तरी 2004 च्या विधानसभेतले यश आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळेलच, याची कोण शाश्वती देणार??, हा खरा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App