प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजितदादांसह ज्या 9 आमदारांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतली. त्या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसने रात्री उशिरा अपात्रतेची तलवार टांगली. अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांची शपथ घेण्याची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पूर्ण अंधारात ठेवून ही शपथ घेतली आहे, अशी तक्रार केली. शिस्तपालन समितीने त्यावर विचार विनिमय करून नोंद घेतली. त्यांच्या सूचनेवरून DISQUALIFY अर्थात अपात्रतेची नोटीस ई-मेलवरून पाठविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशिरा दिली. NCP hung sword of disqualification on 9 ministers including Ajitdada
ही नोटीस त्यांना व्हॉट्स एपवर पाठविली आहे. तसेच ही नोटीस त्यांना प्रत्यक्ष जाऊन देणार आहे. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 9 आमदार मिळून पक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
नव्या उमेदीने संघटना उभी करायची
संघर्ष कसा करायचा असा प्रश्न समोर आला त्याची एक अपॉर्च्युनिटी कशी करायची आणि संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा घेतली. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो आणि त्याच्यातून उमेदीने संघटना उभी करायची असते. दादा आयुष्यभर मोठा भाऊ राहील. त्यांच्याबद्दल पवार साहेब सविस्तर सकाळी बोललेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले दोन अडीच दशक काम करते. शरद पवार हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं. त्या बाकीच्यांनीही आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिले आहे. अर्थातच ती आम्हाला वेदना देणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटना, संघटनेच्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणे आणि पुढे जाऊन महाराष्ट्राच्या देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम करणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
दादांशी वाद घालणार नाही : सुप्रिया सुळे
दादा माझा मोठा भाऊ त्याच्यामुळे अर्थातच दादाची मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणार नाही. जेव्हा दादाचं माझं नातं जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतात तेव्हा मी प्रोफेशनल मोडमध्ये येते. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब आहे. पवार साहेब हे त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सगळ्यांना मुलासारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे आजची घटना ही सर्वाना वेदना देणारी आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
माझे व्हीप त्यांना बंधनकारक राहतील, असे शरद पवार नियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
माझा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर प्रखर विश्वास आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते सगळे अस्वस्थ झाले असतील हे खरं आहे. कारण जे कष्ट करतात, आम्हाला लोकांना निवडून देतात, आम्ही सांगतो ती भूमिका मांडतात आणि काही लोक विरोधी संघर्षाची भूमिका घेतात, ज्यांची संघर्षाची आणि विरोधाची भूमिका घेतली आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर कार्यकर्ते अस्वस्थ होणार. यामध्ये त्यांचा दोष नाही. पण त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटनेची बांधणी करायचं काम करावं लागेल. हे काम मी आणि संघटनेचे असंख्य तरुण माझ्याबरोबर करतील याची मला पूर्ण खात्री आहे. असा त्यांचा निर्णय असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी नीती आहे त्यामध्ये या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.
विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार ते आताच सांगू शकत नाही. कारण राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करायची असेल तर हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यांचा निर्णय मी घेऊ शकत नाही. पण मी पक्षप्रमुख बोलून तीन-चार दिवसात असिस्ट करु. महाविकास आघाडीत चर्चा करुन ठरवू. आता आम्हाला ते सांगता येणार नाही.
काही आमदार नाराज आहेत ते पुन्हा परत येणार. आमची भूमिका वेगळी आहे असे काही आमदार म्हणाले. ते येत्या दोन दिवसात येऊन भेटणार आहेत. आजच्या शपथविधीवरून पक्षात नाराजी आहे. जे पक्ष चौकटीबाहेर जातील आणि बाहेर गेले. त्या प्रत्येकाबाबत निर्णय घेऊ.
दोन विषय आहेत, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. कारण आमच्याकडे राजीनामा दिलेला नाही. कदाचित राजीनामा द्यायचा असेल तर तो द्यायचं ठिकाण अध्यक्षांकडे आहे. तो राजीनामा बहुतेक विधानसभा अध्यक्षांकडे गेला असेल. तो आम्हाला कळण्याचं कारण नाही. तो दिला असेल. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही.
पक्षाचं नाव घेऊन कुणी काहीही भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही काही भाष्य करणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोकांचा पाठींबा, लोकांची भूमिका ही आमच्या विचार, धोरणांसोबत कशी राहील यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
शरद पवार यांचे आता एककलमी सूत्र
१९८० जे चित्र दिसले तेच चित्र पुन्हा कसे उभे राहील हेच माझे आता एककलमी सूत्र असेल. महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे जाणार. आमची संख्या वाढविणार. देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन येत आहेत. या वेळी आम्ही एक आहोत. आमची साथ आहोत अशी भूमिका मांडत आहेत. पर्यायी शक्ती उभी करावी असे म्हणणारे आहेत ते सोबत आहेत त्यामुळे चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केलाय. तुमचं काय म्हणणं आहे?
माझं काहीच म्हणणं नाही. कुणी काहीही दावा करावा. माझा लोकांवर विश्वास आहे. राष्ट्रवादी पक्ष आला कसा? राष्ट्रवादी हा पक्ष नव्हताच. आम्हाल लोकांचे काँग्रेस पक्षासोबत मतभेद झाले. त्यानंतर आम्ही हा पक्ष स्थापन केला. पहिला हा पक्ष दुसऱ्याने नेला असेल त्याचा आमच्यावर परिणाम झालेला नाही. कुणी काहीही म्हणो आम्ही लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडू. त्या भूमिकेला त्यांचा पाठींबा कसा मिळेल याची काळजी घेऊ.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण पाहिलं, एका नेत्याच्या नेतृत्वात देश पुढे जातो. सुरुवातीला परिस्थिती वेगळी होती. पंडित जवारलाल नेहरु यांच्या नेतृत्वात देश काम करत होता तेव्हा सरदार वल्लभाई पटेल आणि इतरांनी मिळून देश चालवला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व आलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांचं नेतृत्व आलं. आणीबाणीच्या वेळी आपल्या देशाने त्यांचा पराभव केला होता. त्या स्वत: हरल्या होत्या. जी खिचडी झाली होती त्यांचं सरकार आलं. पण नंतर परत इंदिरा गांधी यांचं सरकार आलं.
१९८४ नंतर आपल्या देशात कोणताही एक असा नेता ज्याच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, असं झालं नाही. वेगवेगळ्या गटांना एकत्र करुन देश चालवण्याचा प्रयत्न केला गेला. पण गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश काम करत आहे. मोदी विदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यांना विदेशातही पाठिंबा देतात आणि त्यांचं कौतुक करतात. त्यांचं चांगलं प्रकारे काम सुरु आहे.
देशात वंदे भारत ट्रेन, नॅशनल हायवे यांचं जे काम चालूय ते चांगलं आहे. विरोधक फक्त आपापल्या राज्याचं पाहतात. मला विरोधातला एक तरी नेता दाखवा जो देशाचा विचार करुन राज्याचं काम करेल. मला असा नेते कुठेही बघायला मिळाला नाही.
देशाची एवढी मोठी लोकसंख्या असताना आम्हाला सगळ्यांना वाटलं की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लोकसभा आणि इतर निवडणुका सहकारी पक्षाच्या नात्याने, जसे आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत होतो तसं भाजपसोबत राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आमचे स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. पण देश आणि राज्याच्या निवडणुकीत आम्ही एकत्र जाऊ इच्छितो. देश आणखी मजबूत व्हायला हवा आणि पुढे जायला हवा. सगळ्यांनी एकजुटीने सामना केला पाहिजे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. पक्षाचे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आम्ही तरुणांना संधी मिळावी यासाठी आदिती तटकरे यांनी संधी दिली.
मला आठवतं, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही १९९९च्या वेळी निवडणूक लढवली होती तेव्हा आम्ही सगळे तरुण होतो. मी, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे असं आम्हा सगळ्या युवांना संधी मिळाली होती. तसंच आता संजय बनसोडे भाऊ, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील अशा नव्या लोकांना आम्ही संधी दिली आहे. अल्पसंख्याक, महिला, ओबीसी, अशा वेगवेगळ्यांना जास्त संधी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही संधी दिली आहे. आम्ही इतर लोकांनाही संधी देण्यासाठी प्रयत्न करु.
आमच्याकडे सर्व आकडा आहे. आमच्याबरोबर सर्व आमदार आहेत. तुम्ही काळजी करु नका. आकडा सांगायला काही मटक्याचा आकडा आपल्याला काढायचा नाही. त्यामुळे तुम्ही तो विचार करु नका. सगळे आमच्यासोबत आहेत. पक्ष आमच्यासोबत आहे. आम्ही सर्वांना सांगितलं, वरिष्ठांनाही सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App