NCP Sharad Pawar : पुण्यात राष्ट्रवादी एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे:; गुप्त बैठकीनंतर शरद पवार-अजित पवार गटातील हालचालींना वेग

NCP Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : NCP Sharad Pawar पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.NCP Sharad Pawar

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी स्वतंत्र चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. दरम्यान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नसून, ते मुंबईत असल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले. मात्र, ते पक्षासोबतच राहतील, असा विश्वास अंकुश काकडे यांनी व्यक्त केला आहे.NCP Sharad Pawar



पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडून ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीत कोणती समीकरणे आकाराला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटातच अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतर्गत नाराजीचे सूर उघडपणे ऐकू येऊ लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्षातून राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असला, तरी त्याचा दोन्ही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्वावर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण, जगताप यांच्या भूमिकेनंतरही पुण्यात दोन्ही गटांतील नेत्यांची गुप्त बैठक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गटाकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे, तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे सहभागी झाले आहेत. स्थानिक पातळीवरील या चर्चेनंतर महापालिका निवडणूक आणि इतर राजकीय मुद्द्यांबाबतचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार असल्याचे समजते.

जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची- प्रशांत जगताप

दरम्यान, प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. आपण लवकरच मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याशी आपला वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत त्यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला की, एकीकडे अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी असताना, दुसरीकडे त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची? पुणेकरांना सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकारमुळे पुण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अजित पवार त्या सरकारचा भाग असल्याने जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपण हट्टाग्रही नसून विचारधारेशी निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पक्षांतरांच्या हालचालींनाही वेग आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, पैलवान आणि माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि त्यांची कन्या दीप्ती कांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अंबरनाथ कांबळे हे यापूर्वी भाजपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र

दुसरीकडे, पुणे शहरातही पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र झाल्या असून, युती, आघाड्या आणि नाराजी यांचा गुंता अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची नाराजी आणि पक्षांतरांची लाट, यामुळे पुणे महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

NCP Factions Reunion Pune Municipal Election MVA Alliance Photos VIDEOS Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात