नाशिक : राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!, अशी आज तरी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची अवस्था झाली आहे. NCP and Shiva Sena
राष्ट्रवादी ज्यावेळी अखंड होती त्यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटून ते “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर वरच्या खुर्चीवर चढून बसले होते. अनेकांचे समर्थक तर आपापल्या नेत्यांना “भावी मुख्यमंत्री” मानायला देखील लागले होते. त्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून इतरत्र सगळीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोस्टर वरती मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविण्यात येत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस बाकी कुठल्याही पक्षांपेक्षा भावी मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत खूप आघाडीवर होती. कारण त्यात पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांची संख्या इतर कुठल्याही पक्षांच्या नेत्यांपेक्षा जास्तच होती. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, हे पोस्टर वरचे पर्मनंट मुख्यमंत्री होतेच, पण पहिल्यांदा निवडून आलेला आर. आर. आबांचा मुलगा रोहित पाटील देखील यात मागे नव्हता. या सगळ्या नेत्यांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पोस्टर वरती बसवून टाकले होते. पण यापैकी कुणाचेही स्वप्न अद्याप तरी साकार झाले नाही.
दरम्यानच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून समर्थकांनी लाडू वर कोरले होते. पण ते लाडू खाल्ल्यानंतर नानांचे भावी मुख्यमंत्री पद त्यांच्याच समर्थकांच्या पोटात गेले. नाना कसे बसे 208 मतांनी निवडून येऊन विधानसभेत पोहोचले.
शिवसैनिक किंवा मनसैनिकांनी असला प्रकार कधी केला नाही. कारण शिवसेनेचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री किंवा अन्य कुठल्याही पदापेक्षा शिवसेनेचे सर्वोच्च पद महत्त्वाचे मानत असल्याने कुठल्याच नेत्याला “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर वरती चढविण्याची वेळ शिवसैनिकांवर आली नाही. पण ठाकरे बंधूंना पोस्टर वरती मिठी मारायला लावण्याचे शिवसैनिकांना वेगळेच वेड लागले. मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर त्याचे प्रत्यंतर आले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे टाळी साठी हात पुढे केला आणि ते इंडोनेशियातल्या बालीला निघून गेले. उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंच्या टाळीला प्रतिसाद दिला आणि ते युरोपच्या दौऱ्यावर निघून गेले. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या टाळीला प्रतिसाद दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आणि त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना पोस्टरवर मिठी मारायला लावली. या एकीच्या मिठीच्या निमित्ताने शिवसैनिक आणि मनसैनिकांनी भाजपला डिवचून घेतले. हिंदी सक्तीच्या विषयावर भाजपला ठोकून काढले.
पण पोस्टर वरती भावी मुख्यमंत्री चढवून राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याची महत्त्वाकांक्षा कधी पूर्ण झाली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यापलीकडे शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाची झेप गेली नाही. दोन-तीन वेळा संधी येऊन देखील राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली नाही. मग आता ठाकरे बंधूंना फक्त पोस्टर वरती मिठी मारायला लावून शिवसैनिक आणि मनसैनिकांची ऐक्याची इच्छा पूर्ण होईल का??, हा सवाल लाखमोलाचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App