विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वांद्रे, मुंबई येथे 2458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे. शेतकऱ्यांनी आता रासायनिक खतांवर अवलंबून न राहता नैसर्गिक शेतीकडे वळावे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी झिरो बजेट नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि उत्पादन क्षमता वाढेल. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे, ज्याचा थेट फायदा शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत आहे. भारताला दरवर्षी तब्बल ₹1 लाख कोटींचे खाद्यतेल आयात करावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड वाढवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मिलेट्स (नाचणी, ज्वारीसारखी धान्ये) यांची जागतिक स्तरावर वाढती मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन वाढवले, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढेल आणि ते आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकतील.
नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करणारे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे व्याख्यान शेतकऱ्यांनी नक्की ऐकावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौर ऊर्जा प्रकल्पांचे लाभार्थी शेतकरी यांची ओळख करून दिली आणि त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी संवाद साधत त्यांच्या यशोगाथा जाणून घेतल्या.
नाशिक, अकोला, जालना, पुणे, धुळे आणि साताऱ्यातील शेतकऱ्यांनी सौर प्रकल्प व सौर पंपांमुळे उत्पादनवाढ, उत्पन्न दुपटीने वाढ व रोजगार निर्मिती कशी झाली हे सांगितले. काही ठिकाणी पिकांची विविधता वाढली, तर काही ठिकाणी ग्रामपंचायतींनाही महसूल मिळू लागला. पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून 32.08 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. याशिवाय विविध योजनांतर्गत आतापर्यंत 6,46,694 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. या कामगिरीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला असून 20.95 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्यात यश आले आहे.
कार्यक्रमाला महावितरण आणि महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक, राज्यातील ‘पी एम कुसुम सी’ – ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ आणि ‘पी एम कुसुम सी बी’, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App