विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्बन नक्षलवादी संघटनांची यादी हवी आहे. त्यासाठी त्यांनी फडणवीसांना पत्र देखील लिहिले आहे. पण या सगळ्या राजकीय पत्रापत्रीतून नानांना अर्बन नक्षल्यांची यादी हवी आहे, की त्यांनाच भारत जोडो यात्रेची पोलखोल करायची आहे??, असा सवाल तयार झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिवाचनाला दिलेल्या उत्तरात अर्बन नक्षलवादाचा विशेषत्वाने उल्लेख केला होता. काठमांडूमध्ये झालेल्या अर्बन नक्षलवाद्यांच्या बैठकीचा सगळ्यात तपशील आपल्याकडे उपलब्ध असल्याचा खुलासा त्यांनी विधानसभेत केला होता. थेट विधिमंडळाच्या फ्लोअर वर तो खुलासा केल्याने मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला कायदेशीर वक्तव्याचे अधिष्ठान प्राप्त झाले. त्यामुळे महाराष्ट्रातला अर्बन नक्षलवाद पुन्हा एकदा चर्चेच्या ऐरणीवर आला. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संशयाच्या फेऱ्यात अडकली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये कोणकोणत्या अर्बन नक्षल संघटना सामील होत्या, याची यादी आपल्याकडे आहे. किंबहुना 2012 मध्येच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी काही अर्बन नक्षलवाद्यांची यादी चिन्हित केली होती, त्यांचादेखील त्यात समावेश आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरामुळे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अर्बन नक्षलवाद्यांनी कशी घेरली होती हे उघडकीस आले.
पण मुख्यमंत्र्यांनी त्या उत्तरात विधानसभेत तरी त्या यादीचा सविस्तर उल्लेख केला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी सामाजिक नावाच्या कामाखाली कोणत्या अर्बन नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत, ज्याची माहिती सरकारकडे आहे ते अद्याप उघड झाले नव्हते. नाना पटोले यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अर्बन नक्षलवादी संघटनांची यादी आपल्याला द्यावी, अशी मागणी करून अप्रत्यक्षपणे राहुल गांधींची भारत जोडो यात्राच “एक्सपोस” करायचा प्रयत्न चालविला आहे.
समजा नानांच्या पत्रानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत सामील झालेल्या नक्षलवादी संघटनांची यादी त्यांना उत्तरादाखल पाठवली आणि ती प्रसिद्ध केली, तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सगळी पोलखोल होईल. याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे देखील विशिष्ट पार्श्वभूमी आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला, त्याचे खापर काँग्रेसच्या नेत्यांनी नानांवर फोडले. नक्षलवादी संघटनांची यादी जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, तर आपोआपच नानांवरचे पराभवाचे किटाळ दूर होईल. पराभवाचे खरे कारण समोर येईल, असा चतुर विचार करून, तर नानांनी मुख्यमंत्र्यांना “ते” पत्र पाठविले नाही ना??, असा दाट संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App