विशेष प्रतिनिधी
नागपूर : Anil Deshmukh महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.Anil Deshmukh
गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना प्रत्येकी 12 ते 15 जागा सोडण्याचे संकेत देण्यात आले होते. गेल्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि निवडून आलेले नगरसेवक या निकषांवर जागावाटप निश्चित झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Anil Deshmukh
‘रात्री 3 वाजता एकतर्फी निर्णय’ – अनिल देशमुख
या घडामोडींवर संताप व्यक्त करताना अनिल देशमुख म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून सकारात्मक चर्चा सुरू होती. अगदी काल रात्रीपर्यंत जागांची यादी अंतिम झाली होती आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या. मात्र, काँग्रेसने रात्री 3 वाजता अचानक आणि एकतर्फी युती तोडल्याचा संदेश दिला. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने आणि आम्हाला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीकडून ‘एबी’ फॉर्मचे वाटप
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता आक्रमक झाली आहे. आघाडी तुटल्याचे स्पष्ट होताच पक्षाने आपल्या इच्छुक उमेदवारांना तातडीने ‘एबी’ फॉर्मचे वाटप करून स्वतंत्रपणे अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या बिघाडीमुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेसची शिवसेनेसोबतची युती अद्याप टिकून आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App