भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची एकी; पण निवडणुकांच्या तिकीट वाटपात एकी की बेकी??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचा विषय काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एवढा राजकीय चतुराईने वाढवून ठेवला आहे, की त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे संयुक्त सभांचे स्वप्न देखील ठेवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, नाना पटोले हे तीन नेते या संयुक्त सभांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एकत्रितरित्या संबोधित करणारा असल्याचे महाविकास आघाडीने सांगितले देखील आहे.MVA leaders may come together in United rallies, but will that unity remain intact in seat adjustment??

कोणत्याही आघाडीच्या संयुक्त सभा होणे ही भारतीय राजकारणातील नेहमीची प्रचलित बाब आहे. महाविकास आघाडीत सध्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनच घटक पक्ष आहेत. त्यामुळे तिघांची संयुक्त सभा होणे यात विशेष काहीच नाही. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी तब्बल 19 विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलवून महाशक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे 19 पक्षांचे नेते जर एकत्र जमू शकतात, तर तीन पक्षांचे नेते महाराष्ट्रात एकत्र जमण्यात काहीच विशेष बाब नाही. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा हा एकीचा संयुक्त सभांचा प्रयत्न त्या सभांच्या पलिकडे जाणार की नाही??, हा सर्वात कळीचा प्रश्न आहे.



संयुक्त सभांमधून जे ऐक्य निर्माण होईल ते ऐक्य महाविकास आघाडीत महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपात टिकून राहील का??, या प्रश्नाच्या उत्तरातच महाविकास आघाडीचे खरे ऐक्य किती टिकेल याचे राजकीय इंगित दडले आहे.

 महापालिका निवडणुकीत लिटमस टेस्ट

महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या एकीची लिटमस टेस्ट होईल. भाजप आणि शिंदे गट युती करून या निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकास एक असा उमेदवार भाजप शिंदे गटाच्या युतीपुढे उभे करणे हे खऱ्या अर्थाने ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापुढे आव्हान असणार आहे. हे आव्हान हे तीनही पक्ष पेलणार का?? यावर महाविकास आघाडीची एकी की बेकी??, याचा निर्णय होणार आहे.

 विधानसभेचे तिकीट वाटप

त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकसंधतेने भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीला सामोरे जायचे असतील, तर 288 जागांपैकी सर्वच्या सर्व जागा विभागून ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना लढवाव्या लागतील. त्यातही ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर झाली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात असताना शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष अशा छोट्या पक्षांनी आपल्याला तिकीट वाटपात महाविकास आघाडीत वाटा मिळेल या अपेक्षेने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कदाचित विधानसभेच्या तिकीट वाटपात या छोट्या पक्षांना देखील कोठे ना कोठे सामावून घ्यावे लागेल. अशा स्थितीत महाविकास आघाडी तिकीट वाटपात एकसंध राहील का??, हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे!!

 विधानसभेच्या आकड्यांची वस्तुस्थिती

कारण 288 पैकी तीन किंवा चार पक्षांमध्ये जागांची विभागणी झाली, तर प्रत्येकाच्या वाट्याला 80 ते 85 जागा लढवण्यासाठी उपलब्ध होतात. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात समसमान वाटप झाले, तर प्रत्येकी 96 जागा लढण्यासाठी त्यांच्या वाट्याला येतात. याचा अर्थ महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाचा पराभव करण्याचे महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या तीन पक्षांना 100 जागा सुद्धा लढवायला मिळत नाहीत, ही आकडेवारीची वस्तुस्थिती आहे!!

अशा स्थितीत हे तिन्ही पक्ष भाजप आणि शिंदे गटा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त सभा जरूर घेतील. त्याला उद्धव ठाकरे, अजितदादा पवार आणि नाना पटोले हे नेते संबोधित देखील करतील. पण तिकीट वाटपात हेच नेते एकत्र बसून सामोपचाराने मार्ग काढतील का?? किंबहुना काढू शकतील का?? हा आपापल्या पक्ष वाढीच्या दृष्टीने सर्वात कळीचा प्रश्न ठरणार आहे!!

यातल्या प्रत्येक नेत्याला स्वतंत्र महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक नेत्याला स्वतःचा पक्ष बाकीच्या दोन पक्षांपेक्षा मोठा असल्याचे निवडणुकांमध्येच सिद्ध करायचे आहे. अशा स्थितीत समसमान जागावाटप करून हे तिन्ही पक्ष आपली ताकद जोखतील की संयुक्त सभांमध्ये तयार होत असलेली एकी तिकीट वाटपाच्या खडकावर फुटून बेकी तयार होईल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

 भाषा एकीची, कृती बेकीची!!

महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये होणारी चर्चा आणि घेतले जाणारे निर्णय हा भाग अलहिदा. तेथे नेहमीच ऐक्याची भाषा होत असते. पण प्रत्यक्ष राजकीय कृतीत मात्र विरोधकांमध्ये अनेकदा बेकीच असल्याचे अनुभवाअंती दिसून आले आहे. मग महाविकास आघाडीत संयुक्त सभांमध्ये अपेक्षित असलेली एकी तिकीट वाटपातही एकीच राहील की अखेरीस बेकी तयार होऊन महाविकास आघाडी फुटेल??, यावर निवडणुकांच्या निकालाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचा निष्कर्ष कोणतीही मतचाचणी अथवा एक्झिट पोल पेक्षा निश्चित वेगळा असणार आहे!!

MVA leaders may come together in United rallies, but will that unity remain intact in seat adjustment??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात