Sambhajiraje : संभाजीराजेंची राज्यसभेची “अपक्ष” महत्त्वाकांक्षा; हातचे राखून आणि अंतर राखून चाचपणी!!


राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी आजच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करताना “हातचे राखून आणि अंतर राखून” हे धोरण असल्याचे दाखवून दिले आहे. खरे म्हणजे ही त्यांच्या वैयक्तिक राजकारणाच्या वाटचालीची चाचपणी आहे. राष्ट्रवादीतून लोकसभा निवडणूक लढवून त्यांना अपयश आले होते आता पुन्हा अपयश पदरात घेण्याची त्यांची इच्छा नाही आणि त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी देखील ते परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी हातचे राखून आणि अंतर राखून “अपक्ष मार्ग” स्वीकारला आहे. MP Sambhaji Raje announced his political journey at today’s press conference in Pune

संभाजीराजे यांनी “स्वराज्य” नावाने संघटनेची स्थापना जरूर केली आहे, पण त्याचे स्वरुप म्हटले तर राजकीय म्हटले तर सामाजिक असेच ठेवले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही, तर आपण सर्व पक्षांच्या पलिकडे जाऊन राजकारण करू इच्छितो, असे पंख यांनी पसरण्याचा प्रयत्न केला आहे. नेमके हेच ते “हातचे राखून आणि अंतर राखून” आहे…!!

– आधी भाजपशी जवळीक

संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारली, तेव्हा ते भाजपच्या जवळ गेल्याचे दिसले. पण जशी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत आली तसे त्यांनी भाजपपासून अंतर राखायला सुरुवात करून महाविकास आघाडीशी विशेषतः राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली. मराठा आरक्षण देण्यात महाविकासआघाडी कमी पडली तरी देखील संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला अनुकूल भूमिका घेतली. यावरूनच त्यांच्या भूमिकेतला बदल दिसून आला.– राष्ट्रवादीतून लोकसभेतले अपयश

पण हेच ते संभाजी राजे आहेत, ज्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव अजूनही त्यांना डाचत असल्याचे लपून राहत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशी “सायलेंट” भूमिका घेताना ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मात्र थेट जवळ जाताना दिसत नाहीत. आपण कोल्हापूर राजघराण्याचे वंशज आहोत. त्यामुळे आपली प्रतिमा सर्व पक्षांच्या पलिकडे किंबहुना वरची जपण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. यासाठीच त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याचा मनसूबा जाहीर केला आहे. राजकारण तर करायचं पण ते उघडपणे नाही तर ते छुपेपणाने किंवा शक्यतो सगळ्या डगरींवर हात ठेवून असाच संभाजीराजांचा होरा दिसतो आहे…!! यामागे आपली सर्वपक्षीय मैत्रीची किंबहुना त्या पलिकडची भूमिका असल्याचे जरी ते पत्रकार परिषदेत म्हणत होते तरी त्यामागची कोणत्याही पक्षात जाऊन आपल्याला जर पुन्हा राष्ट्रवादीतल्या सारखे अपयश आले तर राजकारण संपुष्टात येण्याची भीतीही त्यामागे दडल्याचे स्पष्ट आहे.

– पुन्हा लोकसभा पण…

संभाजीराजे अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेत इंटलेक्च्युअल लोक येतात म्हणून मला राज्यसभा आवडते, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. पण त्याच वेळी मी लोकसभा निवडणूक लढवणारच नाही, असे काही नाही असा मधूनच खुलासा त्यांनी केला आहे… आणि इथेच खरी त्यांच्या राजकीय वाटचाली मेख दिसून येते आहे…!!

– एकपक्षीय राजकारणातून क्षमतेची शंका

संभाजी राजे यांना खरे म्हणजे लोकसभेत प्रवेश करायचा आहे. पण कोणत्याही पक्षाचा शिक्का लागला की बाकीचे सगळे पक्ष आपल्यावर तुटून पडणार याची त्यांना पक्की खात्री आहे आणि त्या तुटून पडणाऱ्या पक्षांवर मात करण्याची आपली क्षमता आहे की नाही याविषयी देखील त्यांना खरी शंका आहे. त्यामुळेच राज्यसभेच्या निमित्ताने सर्व अपक्ष आमदारांना संघटित करता आले, एक विशिष्ट ताकद अपक्ष म्हणून उभी करता आली तर पहावे, असाही त्यांचा होरा आहे.

– भाजपशी संलग्न अपक्ष तोडायचेत

संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढविण्याचा खेळीमागे आणखी एक महत्त्वाची राजकीय बाब दडली आहे, ती म्हणजे या निमित्ताने महाविकास आघाडी अथवा भाजप त्यातही विशेषतः भाजप यांच्याशी संलग्न असणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे. अर्थात या खेळीमागे नेमका कोणाचा हात आहे??, हे सांगायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा थोडाफार ज्यांना अभ्यास आहे त्यांना हे निश्चित समजू शकते.

– 51 व्या वर्षीची चाचपणी

पण अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणे ही संभाजीराजे यांच्या वैयक्तिक राजकारणाची चाचपणी आहे हे मात्र नक्की. वयाच्या 51 व्या वर्षी ते ही राजकीय चाचपणी करत आहेत. आता या चाचपणीत ते किती यशस्वी ठरतात आणि पुढे वाटचाल कशी करतात हे पाहणे महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा त्यांच्या वैयक्तिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

– संभाजीराजे – फडणवीस चर्चा

संभाजीराजे परवाच देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी झालेली राजकीय चर्चा बाहेर सांगता येणार नाही, असे उत्तर नंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. संभाजीराजे यांना पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर आपण फक्त फडणवीसांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटलो होतो, असे त्यांनी उत्तर दिले. याचा नेमका अर्थ काय??, हे देखील शोधण्याची यानिमित्ताने “नवीन” गरज आहे…!!

MP Sambhaji Raje announced his political journey at today’s press conference in Pune

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात