नाशिक : मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही त्यामुळे कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली. दोन्ही ठाकरे बंधू कालची मातोश्रीतली भेट धरून किमान सहा वेळा भेटले. या दोघांनी कौटुंबिक चर्चेबरोबर राजकीय चर्चा देखील केली. परंतु, दोघांनीही अद्याप शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचा निर्णय जाहीर केलेला नाही. दोन ठाकरे बंधू एकत्र आले एवढी माध्यम निर्मित वातावरण निर्मिती करण्याच्या पलीकडे जाऊन ठाकरे बंधूंनी अद्याप तरी मोठा राजकीय निर्णय घेऊन तो जाहीर केलेला नाही.
पण ठाकरे बंधू नुसतेच एकत्र आले आणि त्यांनी अजून राजकीय निर्णय जाहीर केला नसला तरी, काँग्रेसला बरोबर घेऊनच निवडणुका लढविण्याची आणि महाविकास आघाडीत येण्याची मनसे प्रमुख राज ठाकरे यांची इच्छा असल्याचा दावा आज सकाळी संजय राऊत यांनी केला. परंतु त्यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत स्थान नसल्याचा उच्चार केला होता. महाविकास आघाडीत आधीच तीन घटक पक्ष आहेत. त्यात चौथ्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. पण मनसे संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतले नेते घेतील असे सांगून त्यांनी सावध पवित्राही घेतला होता.
संजय राऊतांचे घुमजाव
पण आज सकाळी संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याला छेद देत मनसेला महाविकास आघाडीत घेण्याची वकिली केली होती. परंतु नंतर त्यांनीच आपल्या वक्तव्याबद्दल घुमजावही केले होते. राज ठाकरेंची काँग्रेस सोबत येण्याची इच्छा आहे, असे मी बोललोच नव्हतो, असा मेसेज त्यांनी खुद्द राज ठाकरे यांना पाठविला.
मनसेचा काँग्रेसला प्रस्तावच नाही
पण त्या पलीकडे जाऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी स्पष्ट खुलासा करून टाकला. मनसेने आघाडी करण्यासाठी काँग्रेसकडे कुठलाही प्रस्ताव पाठवलेलाच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये मनसे सामील व्हायचा प्रश्नच नाही. मनसेचे जे काही राजकीय निर्णय असतील, ते सगळे राज ठाकरेच घेतात. ते स्वतःच आघाडी किंवा युती कोणाशी करायची त्याबाबत मनसेचा निर्णय जाहीर करतील. आम्ही फक्त पक्षाची भूमिका मांडत राहू, असे स्पष्ट वक्तव्य बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी केले. त्यामुळे संजय राऊत यांच्या आधीच्या वक्तव्यातली पुरती हवा निघाली.
काँग्रेसला लढायचेय स्वबळावर
याच दरम्यान आज मुंबई काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेसचे खासदार आणि आमदार उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका काँग्रेसने स्वतंत्रपणे स्वबळावर लढविण्याची वकीली केली. त्यामुळे मुंबईत तरी महाविकास आघाडीचे वासलात लागल्याची चाहूल लागली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App