नाशिकमध्ये महारांगोळीतून राष्ट्रहितासाठी मतदानाचा संदेश; नववर्ष स्वागत समितीचा गोदाघाटावर उपक्रम

साकारली ७५ * ७५ फूट म्हणजेच ५६२५ चौरस फुटांची “भरडधान्याची” महारांगोळी!! Message of voting for national interest through Maharangoli in Nashik

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण १३/१४, शके १९४५ – रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजेपासून पाडवा पटांगण येथे महारांगोळीला सुरवात झाली. आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा उद्देश असतो. कार्यक्रमांचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, जनजाती पुनरुत्थान इत्यादी प्रमाणे असतात. या वर्षी “स्वदेशी” हा या सर्व कार्यक्रमाचा विषय (थीम) आहे. म्हणूनच भरडधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारी हि अनोखी अशी महारांगोळी असून तब्बल ७५ * ७५ फूट म्हणजेच ५६२५ चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे.

या महारांगोळीसाठी तब्बल १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मुग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण ३००० किलो इतक्या भरडधान्यचा वापर करण्यात आला. १०० महिलांनी अवघ्या चार तासांत हि महारांगोळी साकारली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले होते म्हणूनच त्या निमित्ताने मिलेट्स, श्रीअन्न, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्व वाढावे या हेतूने ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच या रांगोळीतून “राष्ट्रहितासाठी मतदान करा” हा संदेश देण्यात आला आहे. दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी प्रदर्शन बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महारांगोळीची रचना निलेश देशपांडे यांची आहे. तर महारांगोळी प्रमुख म्हणून आरती गरुड तर महारांगोळी सह प्रमुख म्हणून सुजाता कापुरे आणि मयुरी शुक्ला नवले यांनी जबाबदारी पार पडली. या महारांगोळीसाठी तिळभांडेश्र्वर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण,आर्की.मिलींद कुलकर्णी,श्रीकांत वाणी यांचे सहकार्य लाभले. सकाळी ६.३० वाजता पहिला बिंदू (ठिपका) ठेवण्यासाठी धान्य पिकवण्यापासून ते पूर्ण त्याचे विपणन करेपर्यंत सर्व जबाबदार सामान्य महिला, शुभदा जगदाळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर संध्याकाळी या महारांगोळीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संजय पाटील सर, चंदू काका सराफ, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, जयवंत बिरारी, संजय देवरे, महेंद्र छोरीया आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदा तृणधान्य आणि भरडधान्याचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. यात अकोला ,पुणे, नगर, जव्हार आणि नंदुरबार येथील लोकांनी सहभाग नोंदवला होता. हे प्रदर्शन सकाळी ८ पासून ते रात्री ८ पर्यंत महारांगोळी जवळ पाडवा पटांगण येथे भरवण्यात आले होते. तसेच यंदा रांगोळीतील सहभागी महिलांसाठी तृणधान्य, भरडधान्य पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक महिलांनी त्यात सहभाग नोंदवला होता. नाचणी रोल, नाचणी बिस्कीट अशा वेगवेगळ्या पाककला यावेळी त्यांनी बनवून आणल्या होत्या.

पाककला स्पर्धेत भारती सोनावणे यांनी प्रथम, सुप्रिया गोस्वामी यांनी द्वितीय तर सुचेता हुदलीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या रांगोळीत वापरलेले गेलेले भरडधान्य हे पुढे निवडून, स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजू लोकांपर्यंत, अनाथ, वृध्दाश्रम इथे याचे वाटप केले जाणार आहे, तसेच त्याची खिचडी बनवून त्याचे देखील वाटण्यात येणार आहे. या महारांगोळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री रहाळकर यांनी केले. यावेळी नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यासचे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समितीचे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, राजेश दरगोडे, जयंत गायधनी, जयेश क्षेमकल्याणी, स्वरूपा मालपुरे हे उपस्थित होते.

Message of voting for national interest through Maharangoli in Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात