नाशिक : वनतारातली माधुरी हत्तीण आणि कबुतरांचे दाणे हे विषय मराठी माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी अशा पद्धतीने लावून धरले की जणू काही महाराष्ट्रातले सगळे प्रश्नच सुटून गेलेत!!
गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली माधुरी उर्फ महादेवी हत्तीण माध्यमांनी चर्चेत आणली. तिला विरोधकांनी हवा दिली. हत्तीणीची तब्येत, तिच्याविषयी पेटाने सुप्रीम कोर्टापर्यंत केलेल्या तक्रारी याविषयी फारशी चिंता न करता विरोधकांनी आणि माध्यमांनी तो विषय राजकीय फोडणी देऊन चालविला. माधुरी हत्तीणीशी कोल्हापूरकरांची अस्मिता जोडली. त्यामुळे मोठा जनमताचा रेटा तयार झाला. फडणवीस सरकारला या सगळ्या प्रकारात हस्तक्षेप करावा लागला.
पेटाने केलेली तक्रार आणि कोर्टाने दिलेली ऑर्डर म्हणून माधुरी हत्तीण अंबानींच्या वनतारा प्रकल्पात गेली. याची बातमी देशभर गाजली किंबहुना गाजवली गेली. माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहिली असती आणि तिच्यावर तिथेच उपचार केले असते, तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेपरांनी सुद्धा तिची फारशी बातमी दिली नसती, पण माधुरीला अंबानींच्या वनतारा प्रकल्पात नेल्यामुळे तिला राष्ट्रीय पातळीवरची प्रसिद्धी मिळाली, किंबहुना प्रसार माध्यमांनी ती प्रसिद्धी मिळवून दिली. यामध्ये माध्यमांनी आणि विरोधकांनी महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वादही घुसडला.
या सगळ्या प्रकारामुळे एक निश्चित झाले की कोल्हापूर आणि त्याच्या भोवतालचे सगळे प्रश्न मिटलेत. त्यावर कुठलेही आंदोलन करायची गरज नाही किंवा फडणवीस सरकारनेही कुठल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडवायची गरज नाही. फक्त अंबानींच्या वनतारातली माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठात आणून सोडली आणि तिच्यावर तिथे वैद्यकीय उपचार केले की विरोधकांचे आणि फडणवीस सरकारचे सगळे सवाल संपुष्टात येतील!!
कबुतरांना दाणे टाका
जो प्रकार नांदणी मठातल्या माधुरी हत्तीणीबाबत घडला, तोच प्रकार मुंबईतल्या दादर मधल्या कबुतरांच्या बाबतीत घडला. दादर मधल्या कबुतर खान्यात कबुतरांना दाणे टाकायचे की नाही, हा वाद एवढा भडकवला की तो महापालिका कक्षेच्या बाहेर जाऊन राज्य सरकारच्या कक्षेत आला. कबूतर खाना विरोधक आणि कबूतर खाना समर्थक एकमेकांच्या समोर आले. त्यामध्ये जैन समाजाचा अँगल आला. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यात लक्ष घालावे लागले. जणू काही मुंबईतले सगळेच प्रश्न मिटले आणि कबुतरांना दाणे टाकायचाच प्रश्न उरला म्हणून माध्यमांनी सगळे लक्ष कबुतरांच्या दाण्यांच्या भोवती केंद्रित केले.
महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसांमध्ये बातम्यांचे विषय हत्तीण आणि कबुतरांच्याभोवती फिरले. फडणवीस सरकार मधले मंत्री अधून मधून वादग्रस्त वक्तव्य करत राहिले. रोहित पवार खोटेनाटे व्हिडिओ शेअर करत राहिले. त्याच्या बातम्या माध्यमांनी अधून मधून फोडणीच्या स्वरूपात दिल्या, पण महाराष्ट्रातले सगळेच प्रश्न मिटल्यामुळे माध्यमांनी आणि विरोधकांनी प्रामुख्याने माधुरी हत्तीण आणि कबुतरांच्या दाण्यांचा प्रश्न लावून धरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App