विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे मुंबईत आज उपोषणाला बसले आहेत. आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठा समाजासाठी विशेष मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय झाला. खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सुरु करताच ठाकरे – पवार मंत्रिमंडळाने संबंधित निर्णय घेतला. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी मंत्री होते. Maratha reservation : Thackeray – Pawar government playing political cat – rat game
परंतु हा निर्णय खासदार संभाजीराजे आणि मराठा आरक्षणासाठीचे एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांना मान्य नाही. तसेच संबंधित निर्णय अपुरा असल्याची टीका विनायक मेटे यांनी देखील केली.
मराठा आरक्षण : खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
त्यानंतर सायंकाळी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार संभाजीराजे यांच्या उपोषण स्थळाला म्हणजे आझाद मैदानाला भेट देऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. छत्रपती घराण्यातल्या संभाजीराजेंना मराठा आरक्षणासाठी तसेच मराठा समाजासाठी उपोषण करावे लागणे आपल्या आयुष्यातील काळा दिवस आहे, असे वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी केले. मुख्यमंत्र्यांपर्यंत खासदार संभाजीराजे यांच्या मागण्या पाठपुरावासह करू, असे ते म्हणाले. एक प्रकारे खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळाला घरचा आहेर दिला आहे.
30% श्रीमंत मराठ्यांसाठी आपण उपोषण करत नाही तर गरीब मराठ्यांसाठी आपले आंदोलन आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळात अजितदादा पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासारखे वजनदार मराठा मंत्री असताना आणि त्यांनी मराठा समाजासाठी विशेष मागासवर्ग आयोग स्थापण्याचा निर्णय घेतला असताना खासदार संभाजीराजे यांना तो मान्य होत नाही तसेच हा निर्णय अमान्य केल्यानंतर शिवसेनेचे खासदार असलेले धैर्यशील माने त्यांना भेटून संभाजीराजे यांना उपोषण करावे लागणे हा आपल्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचे सांगतात म्हणजे हे महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तसेच अन्य मागण्यांवर उंदीर – मांजराचा राजकीय खेळ खेळत आहे का??, हा सवाल तयार होतो आहे…!!
मंत्रिमंडळात महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रभावी असे मराठा नेते मंत्रीपदावर बसलेले असताना ते मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत का…?? मराठा समाजाचे समाधान करू शकत नाहीत का…?? हा सवालही तयार होतो.
खासदार संभाजीराजे यांनी आपल्या राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत असताना मराठा आरक्षणासंदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. त्यावर संभाजीराजे यांनी मराठा समाजासाठी आंदोलन करावे. आपल्या खासदारकीसाठी आंदोलन करू नये, असे खोचक टीकास्त्र आमदार नितेश राणे यांनी सोडले होतेच. तसेच अशा राजकीय टिप्पण्या अनेकांनी केल्या आहेत. पण त्या पलीकडे जाऊन जो खरा प्रश्न तयार होतो तो म्हणजे ठाकरे – पवार मंत्रिमंडळात प्रभावी मराठा मंत्री असताना या प्रश्नावर तोड का मिळत नाही??, हा आहे. याचे उत्तर खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणातून मिळणार का…??, हाही तेवढाच लाखमोलाचा सवाल आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App