विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : हैदराबादच्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला ( Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देण्याची घोषणा 17 सप्टेंबरपूर्वी केली जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे ही घोषणा करू शकतात. त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही आमची ही वर्षभरापासूनची मागणी आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि पालकमंत्री यांचे ऐकून समाजासोबत दगाफटका करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हैदराबाद गॅझेटमधील १८८४ च्या नोंदीनुसार मराठवाड्यात ४० लाख कुणबी होते. यात मराठा लोकसंख्येची कोणतीच नोंद नव्हती. त्यामुळे त्या गॅझेटियरमध्ये जी कुणबी नोंद आहे तेच मराठा असल्याचे दावा मराठा अभ्यासक आणि आंदोलकांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरचा दाखला दिला होता. यासंदर्भातील काही कागदपत्रे खुद्द जरांगे यांनीही न्या.शिंदे समितीला दिली आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दगा करू नये
हैदराबाद व सातारा गॅझेट लागू करा, अशी आमची वर्षभरापूर्वीची मागणी आहे. याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यावर तीन महिन्यांपासून काम करीत आहेत. हे गॅझेटियर लागू झाले तर हे गोरगरीब मराठ्यांचे मोठे यश आहे. फक्त मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचे खासदार आणि पालकमंत्री यांचे ऐकून दगाफटका करू नये, एवढीच मागणी. -मनोज जरांगे पाटील, आरक्षण आंदोलक
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App