विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vijay Vadettiwar “विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चा आणि नियोजनामध्ये वेळ वाया घालवण्यात आला,” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत होत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार अशी अनेकांची अपेक्षा होती,” असे म्हणत त्यांनी पटोले यांची स्पष्ट नाव न घेता खिल्ली उडवली.Vijay Vadettiwar
वडेट्टीवार म्हणाले, “उद्धव ठाकरे जे म्हणाले ते अगदी खरं आहे. आम्ही कोणावर बोट ठेवणार नाही, पण प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडायच्या होत्या आणि त्यातूनच मोठे नुकसान झाले. लोकसभेत ‘इंडिया’ आघाडीचं काम समाधानकारक झालं होतं, पण केवळ सहा महिन्यांच्या फरकात विधानसभेत परिस्थिती उलटली.”
वडेट्टीवार भाजपवर टीका करताना म्हणाले, “भाजपची एकंदर रणनीती विरोधकांना पूर्णपणे संपवण्याची आहे. प्रत्येक राज्यात त्यांनी तेच केले आहे. महाराष्ट्रातही तसंच करण्याचा प्रयत्न झाला.” “विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जागावाटपात घोळ झाला. मतदार यादीत त्रुटी होत्या, पण त्याकडे वेळेअभावी लक्ष देता आलं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “राज आणि उद्धव हे सख्खे नाहीत, पण चुलत भाऊ आहेत. आम्ही दूरचे भाऊ आहोत, विचार साम्याच्या नात्याने भाऊ आहोत. त्यांच्या घरातील निर्णय ते आम्हाला विचारून घेणार नाहीत. ते एकत्र येणार की नाही, हे तेच सांगू शकतात.”
विधानसभेच्या परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विधानभवनात जे घडले ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे होते. भाजप आमदाराच्या इशाऱ्यावर हल्ला झाला. आता पुन्हा अब्रू मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील,” असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतही वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “अवकाळी पावसामुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. तरीही अद्याप सरकारने पंचनाम्यांचे आदेश दिलेले नाहीत. इतकं नुकसान होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेत नाही,” असा आरोप करत त्यांनी सांगितलं, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रब्बी हंगामातील नुकसानीसाठी हेक्टरी ₹२५,००० मदतीची मागणी केली जाईल.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App