विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्याचा शासकीय आदेश (जीआर) त्यांना देण्यात आला. परिणामी, जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आणि “आम्ही विजय मिळवला” असा दावा करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
मात्र, जरांगे यांच्या या विजयाच्या दाव्याला आता मराठा समाजातील नेते आणि आरक्षणाच्या अभ्यासकांकडून तीव्र विरोध होत आहे. अनेकांनी शासनाने दिलेला जीआर हा सर्व मराठा समाजासाठी आरक्षणाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तज्ञ आणि अभ्यासकांनी जरांगे यांचा सर्वसमावेशक आरक्षणाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना लाखे पाटील म्हणाले, “जरांगे यांना कायदा आणि शासकीय आदेश यातील फरकही समजत नाही.”
मनोज जरांगे यांनी “मराठा आरक्षणाचा लढा आम्ही जिंकला, आता सर्व मराठे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले” असा दावा केला आहे. परंतु, या दाव्याची पोकळता अभ्यासक आणि कायदा तज्ञांनी उघड केली आहे. यावर टीका करताना लाखे पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण हा विषय एकट्याने हाताळण्याचा नाही, हा तर जगन्नाथाच्या रथासारखा आहे, जो सर्वांच्या सहकार्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पण जरांगे स्वतः एकटेच सर्व काही करत असल्याचा दावा करत आहेत.”
लाखे पाटील यांनी पुढे असा आरोप केला की, जरांगे स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांचे आंदोलन हे समस्त मराठा समाजाचे नसून केवळ कुणबी मराठ्यांचे प्रतिनिधित्व करते. “जरांगे यांची एकही मागणी कायदेशीर, घटनात्मक किंवा मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळवून देणारी नाही. त्यांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून मराठा समाजाचे नुकसानच केले आहे,” असे लाखे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जरांगे आंदोलनाच्या नावाखाली स्वतःची बुवाबाजी चालवतात आणि इतर कोणालाही प्रसारमाध्यमांसमोर येऊ नये यासाठी प्रयत्न करतात.”
लाखे पाटील यांनी असा आरोप केला की, जरांगे योजनाबद्धरित्या मराठा समाजातील घटनात्मक विचार मांडणाऱ्या आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करत आहेत. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला मसुदा (ड्राफ्ट) जरांगे यांना आधीच माहीत होता आणि केवळ शासनाचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळण्याचा दिखावा केला गेला. “जरांगे आधीच शासनासोबत मसुदा तयार करतात आणि नंतर अभ्यासकांशी चर्चेचे नाटक करून समाजाची फसवणूक करतात,” असे लाखे पाटील यांनी सांगितले. तसेच, आरएसएसच्या अजेंड्याप्रमाणे जरांगे मराठा समाजाला इतर समाजांपासून वेगळे पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाशी बेईमानी केल्याचेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App