Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; कारवाईसाठी CM कडे; कधीही अटक शक्य

Manikrao Kokate

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manikrao Kokate अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.Manikrao Kokate

अजित पवारांनी ट्विट करत म्हटले की, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.Manikrao Kokate



संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावे, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असे पवारांनी ट्विट करत म्हटले आहे.

सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक येथील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार ही कारवाई केली जात आहे.

दरम्यान, बुधवारी (दि. 17) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिल्यानंतर कोकाटे यांचे खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले. दरम्यान, ऐन निवडणुकीत कोकाटे यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ‘निर्माण व्ह्यू’ अपार्टमेंटमध्ये 30 वर्षांपूर्वी स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याप्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःसह भाऊ विजय कोकाटे आणि अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे या सदनिका लाटल्याचा ठपका ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती, मात्र सत्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळत जिल्हा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

Manikrao Kokate Resigns Ajit Pawar Accepts Devendra Fadnavis Nashik Police Arrest Warrant Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात