विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manikrao Kokate विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सिन्नर येथील आपला मेळावा रद्दबातल केला आहे.Manikrao Kokate
माणिकराव कोकाटे यांचा राज्य विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिल्यामुळे त्यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या समर्थकांनी सिन्नर येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस होता. पण माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत हा मेळावा रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांच्या समर्थकांनी आजचा मेळावा रद्द केला.Manikrao Kokate
अजित पवारांवर माझा पूर्ण विश्वास – कोकाटे
आपल्याला शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. माझा अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विशेषतः माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही. राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम चालते. त्यामुळे मेळावा घेऊ नका, अशा शब्दांत माणिकराव कोकाटेंनी आपल्या समर्थकांची समजूत काढली. त्यानंतर समर्थकांनी सिन्नर येथील शक्ती प्रदर्शनाचा मेळावा रद्द केला.
माणिकराव कोकाटेंनी घेतले शनिदेवाचे दर्शन
दुसरीकडे, माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनिमंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. त्यांच्या या शनि दर्शनाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर अजित पवार मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकाटे शनिदेवापुढे लीन झाले आहेत हे विशेष.
कोकाटेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी दोन मतप्रवाह
दुसरीकडे, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलून त्यांना वादग्रस्त वक्तव्य व व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील सूत्रांनी केला आहे. त्यांच्या मते, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा की त्यांचे खाते बदलावे याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता कोकाटे यांचाही राजीनामा घेतला तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर काहीजण कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार व अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो असा संदेशही त्यातून जाईल, अशी भीती व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोकाटे यांच्यावर कोणती कारवाई होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित?
उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री पुण्यात 2 तास चर्चा झाली. या चर्चेत माणिकराव कोकाटे यांचे सभागृहातील कृत्य व त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरकार भिकारी असल्याचे केलेले विधान या दोन मुद्यांवर चर्चा झाली. या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकाटे सातत्याने सरकारला अडचणीत आणणारी विधाने करत असल्यामुले त्यांचा राजीनामा घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असा सूर या बैठकीत आवळण्यात आला. त्यामुळे अजित पवार आज सायंकाळपर्यंत कोकाटेंच्या मुद्यावरील आपला अंतिम निर्णय पक्षातील इतर नेत्यांना कळवतील अशी माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App