महाविकास आघाडीत काँग्रेस – शिवसेना तुलनेत “स्वस्थ”; पण राष्ट्रवादीच प्रचंड अस्वस्थ!!… पण का??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली पडली आहे. शरद पवारांनी सावरकर आणि अदानी मुद्द्यावर काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले, तर उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याचा विषय 9 महिन्यानंतर उकरून काढला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नव्हते, असा आरोप पवारांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केला. त्यानंतर उद्धव ठाकरे पवारांची चर्चा करायला सिल्वर ओक वर पोहोचले. तिथे विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा झाली.Major cracks in MVA but more Unrest in NCP than Congress and Thackeray faction

पण मूळात आपल्या टीव्ही चॅनेल्सला दिलेल्या जाहीर मुलाखतींमुळे एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरे गट दुखावतील, हे शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला समजत नसेल काय?? की पवारांच्या मुलाखतींमागे आणखी काही वेगळेच कारण आहे??, याचा शोध घेणे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे आणि त्याबद्दल “पवार बुद्धीची” सर्वच मराठी माध्यमे मूग गिळून गप्प आहेत!!



पवारांच्या एनडीटीव्हीच्या मुलाखतीमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व दुखावले हे खरे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली हे देखील खरे. पण सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेली काँग्रेस अदानी मुद्द्यावर मात्र सावरली आणि राहुल गांधींनी आपली अदानी मुद्द्यावरची जेपीसीच्या मागणीची भूमिका कायम ठेवली. अखेर खुद्द पवारांना एबीपी माझाच्या मुलाखतीत सर्वच पक्ष जर जेपीसीच्या मागणीसाठी ठाम असतील तर आपलाही विरोध नाही, याची कबुली द्यावी लागली. हे एक प्रकारे पवारांचे अदानी मुद्द्यावर काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्यात आलेले अपयश होते.

पण त्या पलिकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा निदर्शनास येतो, तो म्हणजे महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष काँग्रेस आणि ठाकरे गट तुलनेने “स्वस्थ” आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र “प्रचंड अस्वस्थ” झालेली दिसत आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत याचा थोडा आढावा घेतला, तर काही अंदाज नक्की बांधता येऊ शकतो, तो म्हणजे गेले 9 महिने राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे आणि सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे “अर्थहीन” राजकारण हे समजायला फार मोठ्या अभ्यासाची गरज नाही!! जर विरोधी पक्षात बसून “अर्थहीन” राजकारणच करायचे असेल तर राजकारण मूळात करायचेच कशाला?? हा राष्ट्रवादीच्या सर्व स्तरांमधल्या लोकप्रतिनिधींचा नैसर्गिक प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादीचे मूलभूत राजकीय स्वरूपच संघर्षशील पक्ष नव्हे, तर केंद्रापासून जिल्हा परिषदांपर्यंत सर्व स्तरांवर सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी एकत्रित आलेल्या नेत्यांची बांधलेली मोट हे आहे. मग अशा स्थितीत गेल्या 9 महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी सत्तेपासून वंचित आहेत.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट आकडेवारी सादर केली होती. त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सत्ता काळात 3 घटक पक्षांच्या आमदारांच्या निधी वाटपाचा टक्केवारी आणि आकडेवारीचा खुलासा केला होता आणि त्यानंतर शिवसेना – भाजप सत्ता काळात युतीच्या आमदारांच्या निधीचा निधी वाटपाचा टक्केवारी आणि आकडेवारीचा खुलासा केला होता.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 % काँग्रेसला 37 % आणि मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेला 15 % वाटा अर्थसंकल्पातून मिळाला होता. शिवसेना भाजपमध्ये 105 आमदार असलेल्या भाजपला 66 % आणि 40 आमदार असलेल्या शिवसेनेला 34 % वाटा मिळाला आहे, हे फडणवीस यांनी अधोरेखित करून सांगितले होते. या आकडेवारीची बातमी काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध ही झाली होती. पण या आकडेवारीचा आणि राष्ट्रवादीच्या सध्याच्या अस्वस्थतेचा काही संबंध आहे का??, याचा मागोवा घेतला पाहिजे.

9 महिने राष्ट्रवादी सत्तेबाहेर

राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 9 महिन्यांपासून सत्ते बाहेर आहे याचा अर्थ राष्ट्रवादीचे राजकीय आणि आर्थिक भांडवलीकरण थांबले आहे. मग हे भांडवलीकरण पुन्हा सुरू करण्याचा मार्ग काय?? जिथे सत्तेचा वाटा मिळेल तिथे जाणे हाच तो मार्ग आहे!! मग त्यासाठी जी राजकीय पार्श्वभूमी तयार करावी लागते, ती विद्यमान महाविकास आघाडी मोडून काहीतरी नव्हे राजकीय समीकरण तयार करावे लागते याला सर्वसामान्य भाषेत “राजकीय जुगाड” असे म्हणतात आणि ते करण्यात पवार माहीर आहेत. एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत त्यानंतर एबीपी माझाला दिलेली मुलाखत यातून पवारांनी त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातली राजकीय फेरमांडणीची सुरुवात केली आहे का??, हा प्रश्न आहे आणि ही फेरमांडणी राष्ट्रवादीची सत्तेची भूक काही अंशी तरी भागवणार आहे का??, हाही प्रश्न आहे.

सत्तेच्या वाट्यासाठी धडपड

अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादीचे फेरभांडवलीकरण काही प्रमाणात झाले हे खरे. पण शिवसेनेचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि राजकीय नुकसान झाले. काँग्रेस त्या तुलनेत “स्थिर” राहिली. कारण काँग्रेसला पूर्ण संपवणे हा पवारांचाही “घास” नाही ही वस्तुस्थिती आहे!! त्यामुळे काँग्रेस केव्हाही सावरू शकते किंवा राजकीय दृष्ट्या आपला वकूब राखून बाउन्सबॅक होऊ शकते. पण राष्ट्रवादीसाठी विरोधी बाकांवर फार कालावधीसाठी बसणे ही मोठी शिक्षा आहे आणि 2014 ते 2019 अशी 5 वर्षे त्यांना ती भोगावे लागली आहे. आता गेले 9 महिने राष्ट्रवादी विरोधी बाकांवर आहे. सत्तेच्या वाट्यापासून वंचित आहे. मग राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असेल, तर ती अस्वस्थता दूर करण्यासाठी विद्यमान महाविकास आघाडी मोडून काही नवे समीकरण किंवा नवा जुगाड करण्याच्या बेतात पवार आहेत का?? आणि त्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली करण्याचा प्रयत्न होतो आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Major cracks in MVA but more Unrest in NCP than Congress and Thackeray faction

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात