Mahayuti Seat : महायुतीत भाजप-शिवसेना शिंदे गट जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम

Mahayuti Seat

विशेष प्रतिनिधी

पुणे : Mahayuti Seat  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवसेनेने २५ जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी थेट १५ जागांची मागणी केल्याचे वृत्त चर्चेत होते. त्यावर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन देखिल केले होते. त्यानंतर आज सेनेचे नेते प्रमोद नाना भानगिरे तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, भाजप आणि शिवेसेना यांच्यामध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शनिवारी रात्री पर्यंत अंतिम बैठक झाल्यानंतर योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचे गोऱ्हे यांनी पत्रकारांना सांगितले.Mahayuti Seat

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून २० ते २५ जागांची मागणी करण्यात आली आहे. परंतु भाजपकडून ही मागणी मान्य न झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याचे चित्र आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान शिवसेनेच्या बैठकीतून नाना भानगिरे बाहेर पडल्याची घटना चर्चेचा विषय ठरली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, हा प्रकार गैरसमजातून घडला असून त्याचा योग्य तो खुलासा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.Mahayuti Seat



नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला १५ जागांची ऑफर देण्यात आली होती. या जागांवर शिवसेनेच्या वतीने चर्चा झाली असून, पक्षाकडे उमेदवारांची यादीही प्राप्त झाली आहे. मात्र शिवसेना ही पुण्यातील संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची तयारी लक्षात घेता २५ जागा मिळाव्यात, या भूमिकेवर ठाम आहे. यासंदर्भात भाजपला अधिकृत पत्र पाठवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिवसेनेच्या वतीने आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर, भानगिरे आदी उपस्थित होते. यावेळी जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून, सन्मानजनक युती व्हावी, अशी भूमिका सर्वांनी मांडल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. या प्रक्रियेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या चर्चेचा अंतिम टप्पा सुरू असून, दोन्ही पक्षांमध्ये संवाद सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बैठकीदरम्यान नाना भानगिरे बाहेर पडल्याबाबत विचारले असता, गोऱ्हे यांनी सांगितले की, त्यांना अचानक एक फोन आला आणि त्यानंतर त्यांना एक निरोप देण्यात आला. त्या फोनवर काय बोलणे झाले, याची मला माहिती नाही आणि त्यांनी माध्यमांना नेमके काय सांगितले, हेही मला ठाऊक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भानगिरे यांचा गैरसमज नक्कीच दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागावाटपाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना गोऱ्हे म्हणाल्या की, आमची बाजू आणि अंतिम निर्णय हे पक्षाचे मुख्य नेते घेतील. उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात यासंदर्भात काही चर्चा झाली का, याची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र महायुतीत सन्मानजनक वाटा मिळावा, हीच शिवसैनिकांची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. आमचा उमेदवार आमचाच पक्ष ठरवतो. तसेच पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात भाजपने मोठ्या संख्येने जागांवर दावा केल्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी मर्यादित जागा उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली. यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी वाढत गेली. या नाराजीचा उद्रेक शनिवारी उघडपणे पाहायला मिळाला. काही संतप्त शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले.

या आंदोलनामागे जागावाटपाचीच पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपकडून जागांची संख्या कमी ठेवल्याने शिंदे गटातील अनेकांचे राजकीय भवितव्य अडचणीत आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच आंदोलनाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे भाजप उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे शिवसेनेतील नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे पुण्यातील महायुतीची एकजूट कितपत टिकून राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेला पेच अंतिम टप्प्यात असून, आज रात्रीपर्यंत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. या निर्णयाकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, तो महायुतीच्या पुढील वाटचालीसाठी निर्णायक ठरणार आहे.

Mahayuti Seat-Sharing Deadlock Between BJP And Shinde Sena Still

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात