भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात यूएसआयबीसीची महत्त्वाची भूमिका, असल्याचे फडणवीस म्हणाले.
विशेष प्रतनिधी
मुंबई : Devendra Fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे, यु.एस. – इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी) 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित, विशेष शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेचा भाग असणे हा एक मोठा सन्मान असल्याचे, फडणवीस म्हणाले. तसेच गेल्या दशकात अमेरिका-भारत व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात व आर्थिक वाढीसाठी अर्थपूर्ण आणि अनौपचारिक संवादांना चालना देण्यात, यूएसआयबीसीची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.Devendra Fadanvis
यु.एस. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूकदार असून त्याचे देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणूकीत 10 टक्के योगदान आहे. भारतीय उद्योगांनीही अमेरिकेत 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केलेली असून, यापैकी अनेक उद्योगांची मुख्यालये महाराष्ट्रात आहेत. भारताचे आर्थिक पॉवरहाऊस म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, जे देशाच्या जीडीपीत 14 टक्के, निर्यातीत 20 टक्के, थेट परकीय गुंतवणुकीत 35 टक्के योगदान देत महाराष्ट्राने स्वतःचाच विक्रम मोडला असून परदेशी गुंतवणूकदारांचे हे आवडते ठिकाण झाले आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक व स्टार्टअप कंपन्यांमध्येही महाराष्ट्र अव्वल असल्याचे एका अहवालात नमूद केले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी एक इकोसिस्टिम म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक होत आहे. देशातील 65 टक्के डेटा सेंटर येथे आहेत. त्यामुळे राज्याला आता डेटा सेंटरची राजधानी म्हणूनही ओळखले जात आहे. या डेटा सेंटरला पुढील 2023 पर्यंत हरित ऊर्जा पुरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आर्थिक, व्यापारी, नाविन्यता यामधील गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र हे उद्योग जगताचे आवडते ठिकाण झाले आहे. अटल सेतू व नवी मुंबई विमानतळामुळे त्या परिसराचा कायापालट होत असून नवी मुंबईत विशिष्ट संकल्पनेवर आधारित नाविन्यता शहरे उभारण्यात येत आहेत. नाविन्यता, शिक्षणाशी संबंधित इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या परिसरात परदेशातील जागतिक क्रमवारीतील पहिल्या पन्नासमधील 5 विद्यापीठे येणार असून त्यातील तीन विद्यापीठे ही अमेरिकेतील आहेत. त्यामुळे नवी मुंबई हे एक एज्युसिटी म्हणून ओळखली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या पायाभूत विकासकामांचा विस्तृत आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राला जागतिक मनोरंजन शिखर परिषद (ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट – वेव्हज 2025) या परिवर्तनकारी उपक्रमाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. ही परिषद यंदा मुंबईत होणार असून या परिषदेसाठी अमेरिकेतील उद्योजक, गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला, सृजनशीलता आणि प्रतिभा दाखविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी, यू.एस. चेंबरच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुझेन क्लार्क, यूएसआयबीसीचे अध्यक्ष राजदूत अतुल केशप, यूएस कन्सुल जनरल माइक हंकी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App