राज्य सहकारी बॅंकेत लक्षणीय बदल झाल्याचे शरद पवारांचे निरीक्षण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सध्या सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीच्या मुद्यावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचवेळी या बँकेचा 110 वा वर्धापनदिन गुरुवारी (दि. 11) शरद पवार, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबईत साजरा झाला. राज्याच्या सहकार चळवळीत मोलाचे योगदान देणारे सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा.धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या तैलचित्राचे अनावरण यावेळी करण्यात आले. Maharashtra state co-operative bank celebrates it’s 110th anniversary in the presence of Sharad Pawar and Nitin Gadkari


प्रतिनिधी

मुंबई : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी पवार बोलत होते.



विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. वैकुंठभाई मेहता, विठ्ठलदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे.

अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे.

ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. यात कृषी क्षेत्राचा आणि कृषी क्षेत्रात सहकाराचा वाटा मोठा आहे. पूर्वीच्या काळात गरीबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती.

त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी आभार मानले.

Maharashtra state co-operative bank celebrates it’s 110th anniversary in the presence of Sharad Pawar and Nitin Gadkari

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात