विशेष प्रतिनिधी
पुणे : Radhakrishna Vikhe Patil राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या जलाशयांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या धरणांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (फ्लोटिंग सोलर) उभारून महाराष्ट्राला हरित ऊर्जेत आघाडीवर आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.Radhakrishna Vikhe Patil
मंत्री विखे पाटील हे जलसंपदा विभागाने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘हरित ऊर्जा उपयोजन’ या धोरणात्मक परिषदेत बोलत होते. या परिषदेला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, मित्र संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.Radhakrishna Vikhe Patil
वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिंचन पायाभूत सुविधांचा धोरणात्मक वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमुळे जमिनीच्या अधिग्रहणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे शेतीसाठी जमिनीचे संरक्षण होईल.
याशिवाय, जलाशयावर सौर पॅनेलचे आच्छादन असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन पाण्याचे संवर्धन होईल. याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामीण समुदायाला होईल, असा विश्वास श्री. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या परिषदेत सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्या आणि अनेक वैयक्तिक विकासकांनी सहभाग नोंदवला. तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक निकष या बैठकीत प्रामुख्याने चर्चिले गेले.
या योजना राबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पारदर्शक पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केले.
उद्योजकांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन, या तरंगत्या सौर प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करण्याबाबत विचार करेल.
जलसंपदा विभागाच्या जलाशयांवर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र केवळ ऊर्जेत स्वयंपूर्ण होणार नाही, तर हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App