विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा शिवसेनेत परत येण्याचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा होऊ लागली आहे. शिवसेना माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हत तर घर सोडणं होतं, असे ते म्हणाले आहेत.Raj Thackeray
राज ठाकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना लिहिलेले शब्द विशेष लक्ष वेधून घेतात. “आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल,” असे स्पष्ट करत त्यांनी लवचिकतेची गरज मान्य केली आहे. आजच्या राजकीय वास्तवात हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो, कारण महाराष्ट्रातील राजकारण हे आघाड्या, फाटे आणि पुन्हा जुळवणीच्या टप्प्यातून जात आहे.Raj Thackeray
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील षणमुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमातील राज ठाकरे यांचे वक्तव्य अधिक अर्थपूर्ण ठरते. “शिवसेना माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, तर घर सोडणं होतं,” असे म्हणत त्यांनी २० वर्षांपूर्वीच्या विभाजनाकडे भावनिक नजरेने पाहिले. पुढे “अनेक गोष्टी मलाही उमजल्या आहेत, आणि मला वाटतं उद्धवला ही उमजल्या असतील. द्या सोडून त्या आता,” हे वाक्य केवळ व्यक्तिगत भावनांचे प्रकटीकरण न राहता, राजकीय सलोख्याचा इशाराही मानले जात आहे.
मनसेची सद्यस्थिती पाहिली, तर पक्षाला अपेक्षित राजकीय विस्तार साधता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, फाटाफुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटालाही आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकत्र करण्याची गरज भासत आहे.
तथापि, मनसेचे थेट शिवसेना (उबाठा) पक्षात विलीनीकरण होईल, असा निष्कर्ष आत्ताच काढणे घाईचे ठरेल. मात्र, राज ठाकरे यांच्या शब्दांतून उमटणारी नरमाई, पूर्वीच्या कटुतेचा उल्लेख करत “त्या गोष्टी सोडून द्या” असे म्हणणे, आणि बदलत्या राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचा उल्लेख हे सर्व संकेत भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय घडामोडीची नांदी ठरू शकतात.
जर येत्या काळात राज ठाकरे यांनी आपला पक्ष शिवसेना ( उबाठा ) पक्षात विलीन केला, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. हा निर्णय राज ठाकरे घेतील की नाही, हा येणारा काळच ठरवेल. मात्र, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘घर’ या संकल्पनेचा उल्लेख करून राजकीय चर्चेला नवी दिशा दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App