विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये हाके यांनी सात दिवसांच्या आत अजित पवार यांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.Laxman Hake
या नोटीसमध्ये ॲड. शंतनु माळशिकारे यांच्यामार्फत नितीन यादव यांनी स्पष्ट केले आहे की, लक्ष्मण हाके यांनी 19 जून 2025 रोजी पुण्यात आणि 3 जुलै 2025 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात “हरामखोर” असे अपमानास्पद शब्द वापरले. तसेच, मालेगाव कारखाना निवडणुकीत पवारांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत, ओबीसी समाज त्यांच्यापासून दूर गेल्याचेही वक्तव्य केले.
नितीन यादव यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, ही वक्तव्ये अजित पवार यांची प्रतिष्ठा घालवण्याच्या उद्देशाने केली गेली असून, ती भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) च्या कलम 356(1) अंतर्गत मानहानीच्या गुन्ह्यांत येतात. कलम 356(1) नुसार, कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्याचा हेतू असलेले वक्तव्य करणे किंवा अशा वक्तव्याचे परिणाम माहिती असूनही ते करणे, हे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरतो.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांची बिनशर्त सार्वजनिक माफी तीन प्रमुख वृत्तपत्रांत (मराठी, हिंदी व इंग्रजी) आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सात दिवसांत प्रकाशित करावी. भविष्यात अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही बदनामीकारक वक्तव्य न करणे. अजित पवार यांची प्रतिष्ठा घालवण्याचा कोणताही प्रयत्न न करणे.
या मागण्या पूर्ण न केल्यास, नितीन यादव यांनी लक्ष्मण हाके यांच्याविरोधात BNS कलम 356(2) अंतर्गत फौजदारी तक्रार, अब्रुनुकसानीसाठी दिवाणी दावा व बदनामीकारक विधानांपासून प्रतिबंध करण्यासाठी मनाई हुकूम मागण्याचा इशारा दिला आहे. शिवाय, या सर्व कायदेशीर कारवाईचा खर्चही लक्ष्मण हाके यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App