विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंतही स्पष्ट होऊ शकला नाही. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 85-85-85 जागांचा फॉर्म्युला सांगितला होता. त्यानंतर तो 90-90-90 असा ठरवल्याचे समजले. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने याहून अधिक उमेदवारी घोषित केले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने 5 मतदारसंघात दोन-दोन उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडीच्या पक्षांची एकमेकांत लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.Mahavikas Aghadi
मिरज मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसने देखील याच मतदारसंघातून मोहन वनखंडे यांना तिकीट दिले आहे.
सांगोला मतदारसंघात ठाकरे गटाने दीपक आबा साळुंखे यांना तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शेकापकडून देखील बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, दिलीप माने यांचे नाव काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत आले असताना देखील पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे दिलीप माने यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून भागीरथ भालके यांन तिकीट जाहीर झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
परांडामधून शिवसेना ठाकरे गटाकडून रणजीत पाटील यांना तिकीट मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दिग्रस मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने पवन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना तिकीट जाहीर केले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक चर्चा आणि बैठका होऊनही महाविकास आघाडी योग्य समन्वय साधू शकली नसल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे उमेदवार निश्चित झाले नव्हते. तर काही मतदारसंघांमध्ये दोन-दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यांच्यापैकी काहीजण 4 नोव्हेंबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र, सध्या तरी पाच मतदारसंघांमध्ये मविआच्या पक्षांची दोस्तीत कुस्ती पाहायला मिळू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App