नाशिक : गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!, असे आज विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसानंतर पत्रकार परिषदेत घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिघांनी अधिवेशन काळाची संपूर्ण माहिती दिली. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांचा भर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या भांडणावर राहिला. पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या चुकांचा पाढा फडणवीसांच्या समोर वाचला. पत्रकारांचा प्रश्नाचा बाण “पवार बुद्धीतून” आल्याचे फडणवीसांनी ताबडतोब ओळखले आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांचे देखील वाभाडे काढले.
गोपीचंद पडळकर ज्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या विरोधात चुकीचं बोलले, त्यावेळी मी त्यांना समज दिली. नंतर दिलगिरीही व्यक्त केली. पण तुम्ही गोपीचंद पडळकर यांनाच “सिंगल आउट” का करता??, इतरांची वर्तणूक आणि त्यांचे आका कोण हे का तपासत नाही??, असा परखड सवाल फडणवीसांनी विचारला. त्यांनी “पवार बुद्धीच्या” पत्रकाराला एका ठोक्यात गप्प केले. त्यावेळी अजित पवार त्यांच्या शेजारीच बसले असूनही काही बोलू शकले नाहीत.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद तीन दिवसांपासून सुरू होता. ते त्यांना अर्बन नक्षल म्हणाले म्हणून हे त्यांना मंगळसूत्र चोर म्हणाले, पण दोघेही आपण विधानसभेचे सदस्य आहोत, याचे गांभीर्य विसरले. आजकाल आठवीतली मुलंही भांडत नाहीत, अशा पद्धतीने ते दोघे भांडत होते, असा टोला फडणवीस यांनी पडळकर आणि आव्हाड या दोघांनाही हाणला.
– पडळकरांच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादींच्या गेमा
गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले. पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी त्याचे रिपोर्टिंग एकतर्फी केले. केवळ गोपीचंद पडळकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले हा हिस्ट्री शिटर असल्याचे सांगितले, पण जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख हा कसा आक्रमक आणि आव्हाडांचा निष्ठावंत असल्याचे वर्णन केले प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोघांचीही पोलखोल केली. ऋषिकेश टकले यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत तर नितीन देशमुख यांच्या विरोधात आठ गुन्हे दाखल आहेत हे त्यांनी विधानसभेत लक्षात आणून दिले.
या सगळ्या प्रकरणात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांशी हातमिळवणी करून वागत होत्या. पडळकर यांनी एकाच वेळी शरद पवार आणि अजित पवारांना अंगावर घेतले, त्याचा राजकीय सूड उगवण्याची संधी साधायचा प्रयत्न केला. त्यामुळे “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी पडळकर यांना “सिंगल आउट” केले. देवेंद्र फडणवीस यांनी नेमके हेच कारस्थान ओळखले. पडळकर यांना त्यांनी वाचविले नाही, पण जितेंद्र आव्हाड यांचा खोडसाळपणा देखील ठोकायचे सोडले नाही. अजित पवार शेजारी असताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना देखील ठोकून काढले. फडणवीस यांनी संतुलित भूमिका घेतल्यामुळे अजितदादांना सुद्धा पडळकर यांना ठोकताना जितेंद्र आव्हाड यांची बाजू जाहीरपणे उचलून धरता आली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App