मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक
वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी
आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. Joint partnership agreement between MMRDA and SRA for redevelopment of 15 thousand slums
दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, इंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफ, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.
पॉड टॅक्सी वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. याप्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. आज एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुनारे १५ हजार घरांचा पुनर्विकास एमएमआरडीएच्या माध्मयातून करण्यात आहे. याप्रकल्पात पुर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करणार आला.
झोपडपट्टी मुक्त ठाणे
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळया शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.
एमएमआरडीएमार्फत विशेष प्रयोजन वाहन (SPV) कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याव्दारे सल्लागाराची कामे हाती घेण्यास व व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App