नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर तब्बल सात वर्षे काम करून कंटाळलेले जयंत पाटील आज अखेर पद मुक्त झाले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना ते प्रदेशाध्यक्षपदी निवडले गेले होते. परंतु, पद सोडताना ते फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उरले होते. जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची पदोन्नती होण्याची शक्यता असून ते मंगळवारी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. Jayant Patil
जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहावे की न राहावे, या विषयावर अखंड राष्ट्रवादी बरोबरच फुटलेल्या राष्ट्रवादीत देखील चर्चा सुरू राहिली. रोहित पवार आणि रोहित पाटलांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून घालवण्यासाठी जोर लावला होता. जयंत पाटलांच्या ऐवजी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घालावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती. पण जयंत पाटलांचे समर्थक सहजपणे ऐकायला तयार नव्हते.
पण स्वतः जयंत पाटील तसे प्रदेशाध्यक्ष पदाला कंटाळलेच होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. पवारांना फक्त १० आमदार निवडून आणता आले. त्यामुळे जयंत पाटलांना शरद पवारांच्या पक्षाच्या शोभेच्या प्रदेशाध्यक्षपदात रस देखील उरला नव्हता. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले तरी तिथे ते अस्वस्थच राहिले. कारण अजित पवारांच्या सत्तेची वळचण त्यांना मिळू शकली नाही. जयंत पाटलांनी जलसंपदा खात्याचा आग्रह धरल्यामुळे आणि अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांना सत्तेची ओळख मिळू शकली नाही, असे बोलले गेले.
त्यासंदर्भात जयंत पाटलांनी अनेकदा खुलासे केले, पण तरीदेखील त्यांचे पाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत टिकणार नाहीत. ते कोणत्याही क्षणी भाजपच्या गोटात निघून जातील आणि मंत्री बनतील, याची चर्चा कधीही थांबली नाही.
याच दरम्यान भाजपने जयंत पाटलांचा सांगली जिल्हा राजकीय दृष्ट्या पोखरून काढला. वसंतदादांच्या घराण्यातले वारसदार भाजपमध्ये घेतले त्यामुळे स्थानिक पातळीवर जयंत पाटलांची ताकद पुरती घटली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहून देखील जयंत पाटलांना सांगली जिल्ह्यातली पक्षाची गळती रोखता आली नाही.
आता ज्यावेळी जयंत पाटील पदमुक्त झालेत, त्यानंतरही ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहतील आणि अनेक नेत्यांपैकी एक नेता म्हणून काम करतील याची शक्यता पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेकांना वाटत नाही. त्यामुळे जयंत पाटलांचे पाय पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार नाहीत. ते विधानसभेत विरोधी बाकांवर बसून काम करणार नाहीत. उलट आता पदमुक्त झालोय, तर भाजपची वाट धरा असे म्हणून ते सत्तेच्या वळचणीला येऊन बसतील, याविषयी त्यांचेच कार्यकर्ते अटकळी बांधत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App