विशेष प्रतिनिधी
पिंपरी : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल की नाही??, मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कितपत परिणाम करू शकतील??, याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असताना परभणी लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. मनोज जरांगे परभणी लोकसभा मतदारसंघात फिरले असले तरी प्रत्यक्षात त्यांचे गाव अंतरवली सराटीमधून आपण 70 % मते घेतली आहेत, असे महादेव जानकर म्हणाले.Jarange moved to Parbhani, but polled 70% in his own village; Claim of Mahadev Jankar
पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकारांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले, मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी हे गाव माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघात येते. अंतरवली सराटीमधून मला जवळपास 70 % मतदान झाले, माझ्या विरोधकाला फक्त 30 % मते मिळू शकली. मनोज जरांगे पाटील 7 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरले, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. परभणी लोकसभा मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे.
मी मेलो तरी चालेल पण मी माझ्याच पक्षाच्या चिन्हावर आमदार खासदार होणार आहे. मी कधीच कमळावर किंवा धनुष्यबाणावर दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर आमदार – खासदार होणार नाही. दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणे चांगले, अशी स्पष्टोक्ती महादेव जानकर यांनी केली.
परभणी लोकसभा निवडणूक
2024 ची परभणी लोकसभा निवडणूक फारच गाजली. प्रत्येक वेळी खाण पाहिजे की बाण पाहिजे या मुद्द्यावर चालणारी निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावर आली. महायुतीच्या वतीने महादेव जानकर या तगड्या ओबीसी उमेदवाराला परभणीच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवले आणि त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून दोन वेळेस खासदार राहिलेले संजय जाधव हे मराठा उमेदवार होते. संबंध निवडणूक प्रचाराच्या कार्यकाळात मराठा विरुद्ध ओबीसी असा प्रचार करण्यात आला. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसींची संख्या 8 ते 9 लाख असल्याने माझाच विजय होणार असा दावा देखील जानकर यांनी केला होता, तर दुसरीकडे कडवट शिवसैनिक असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मात्र सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यावर निवडणूक लढवली.
मनोज जरांगे यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान परभणी जिल्ह्याचा दौरा केला. मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, असे आदेशच जरांगे यांनी दिले होते. महादेव जानकर यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केल्याने मराठा समाजाला जानकारांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन अप्रत्यक्षरित्या केले होते.
पण महादेव जानकर यांनी आज पिंपरी चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट मनोज जरंगे यांच्या अंतरवली सराटी गावातूनच 70 % मतदान मिळाले असल्याचे जाहीर करून त्यांना डिवचले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध करणाऱ्या महादेव जानकर यांना जर मराठा समाज 70 % मतदान करत असेल तर मग जरांगेंच्या घोषणेला काही अर्थ आहे की नाही??, असाही सवाल मतदारसंघात यानिमित्ताने विचारला जातोय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App