विशेष प्रतिनिधी
पुणे : जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप (ताडीवाल रोड, पुणे) यास ATS ने अटक केली. लॅपटॉप एक दोन नव्हे, तर तब्बल 15 वर्षे फरार होता.Jahal Maoist Prashant Kamble
संगणक आणि लॅपटॉप रिपेरिंग करणारा पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी प्रशांत कांबळे कबीर कला मंचच्या संपर्कात आला. नोव्हेंबर 15, 2010 रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून तो घरातून निघून गेला, मात्र परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने 18 जानेवारी 2011 रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला.
ATS ने 2011 दरम्यान संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली. तिचे पुण्यात सक्रीय असणारे सहकारी आणि कबीर कला मंचचे काही कलाकारही या नक्षलवादाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ATS तपासात पुण्यातून मिसिंग झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे समोर आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले. दोघे सर्वोच माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मिलिंद तेलतुंबडेलाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी करण्यात आहे. मिलिंद नोव्हेंबर 2021 मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. संतोष शेलार आजारी अवस्थेत जानेवारी 2024 मध्ये पुण्यात घरी आला असताना ATS त्याला अटक केली.
आता पुणे ATS ने प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप यास अटक करून ठाणे युनिटच्या ताब्यात दिले. आज रोजी ठाणे न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. संगणक दुरुस्ती कौशल्यामुळे त्याला नक्षलवादी चळवळीत “लॅपटॉप” नाव देण्यात आले. जंगल तसेच शहरी भागात त्याच्या नक्षलवादी कामाबाबत पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या गुन्ह्यातील अँजेलासह इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. तर २०२० मध्ये कबीर कला मंचचे तीन कलाकार याना NIA ने एल्गार परिषद – कोरेगाव भीमा केसमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App