प्रतिनिधी
मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. यावेळी शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असल्यामुळे ते दर्जेदार असायला हवे, असेही त्यांनी सांगितले. International Music College will be started on Latadidi’s birth anniversary
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कलिना संकुलात जागा
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागे अभावी अडचण येऊ नये म्हणून पु. ल. देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
२८ सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे. या निमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App