विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Vadettiwar विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या हाराकिरीची जबाबदारी पूर्णतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद प्रकर्षाने चव्हाट्यावर आलेत.Vijay Vadettiwar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपुरात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नाना पटोले यांची असल्याचा दावा केला आहे.
पटोलेंनी घेतले होते लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारीही त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वाविषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, पक्षश्रेष्ठींसोबतच्या चर्चेत कोण सहभागी होतात? व काय मत नोंदवतात? यावरच सर्व अवलंबून आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सध्या फक्त 16 आमदार आहेत. त्यांच्या भरवशावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी याची चाचपणी व चर्चा होणे आवश्यक आहे. वडेट्टीवार यांचा हे नमूद करताना सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.
पटोलेंवर राज्यातील अनेक नेते नाराज?
उल्लेखनीय बाब म्हणजे नाना पटोले यांच्यावर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना हटवण्याची मागणी गत अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पटोले यांच्यावरच विश्वास दर्शवला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपात काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर जागावाटपाच्या बैठकांची जबाबदारी नाना पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App