विशेष प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas भाजप आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याकांड व पवनचक्की खंडणी प्रकरणात अडकलेला ‘आका’ (वाल्मीक कराड) सुटणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. खंडणी प्रकरणात आकानेच माणसे पाठवली होती. त्याच्याच आदेशाने ही माणसे तिथे गेली होती. त्यामुळे आका यातून सुटतील असे मला वाटत नाही, असे ते म्हणालेत.Suresh Dhas
सुरेश धस यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आकाने दोन कोटींची खंडणी मागितली होती. त्यापैकी 50 लाखांची पहिला हप्ता देण्यात आला होता. उर्वरित दीड कोटींसाठी तगादा सुरू होता. त्यासाठी आकानेच माणसे पाठवली होती. आकानेच त्यांना सांगितले होते. त्याच्या आदेशानुसारच ते तिथे म्हणजे पवनचक्की परिसरात गेले होते. त्यामुळे शुक्रवार ते सोमवार (6 ते 9 डिसेंबर) दरम्यान निश्चितच त्यांच्यात बोलणे झाले असेल. त्यामुळे सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले हे स्पष्ट होईल. त्यामुळे आका यातून सुटतील असे मला वाटत नाही.
फोन उचालयचे नसतील तर नंबर कशाला दिले?
पोलिसांनी संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींच्या नावाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यासंबंधी त्यांनी एक मोबाईल क्रमांकही दिला आहे. पण त्या क्रमांकावर कुणीच प्रतिसाद देत नाही. पत्रकारांनी ही बाब सुरेश धस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर धस यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अशी तक्रार असेल तर मी स्वतः पोलिस अधीक्षकांशी बोलेन. फोन उचलायचा नसेल तर त्यांनी हे नंबर कशाला दिलेत? माझे मत आहे की, बकरे की मां कब तक दुआं मांगेंगी.
प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत सर्व फोकस हा आका पकडण्यासाठी होता. त्यामुळे या प्रकरणातील इतर आरोपी आतापर्यंत फरार राहिले असावेत. हे आरोपीही लवकरच पकडले जातील. ते सुद्धा आतमध्ये जातील. कारण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी कुणालाही न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे.
सुरेश धस म्हणाले, या प्रकरणाच्या तपासात काही टॉप सिक्रेट आहेत. पोलिसांनी ते उघड करण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवेगळ्या भागांत तपास पथके पाठवली आहेत. त्याची माहिती उघड झाली तर आरोपी पसार होण्याची भीती असते. त्यामुळे यासंबंधी अत्यंत गोपनीयपणे काम केले जात आहे. या प्रकरणाकडे सर्वच लोकांचे लक्ष आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी सुरू असलेल्या कारवाईची माहिती उघड करण्यास नकार दिला आहे.
बीडच्या पालकमंत्रीपदावरही भाष्य
आमदार सुरेश धस यांनी यावेळी बीडच्या पालकमंत्रीपदावरही भाष्य केले. ते म्हणाले, बीडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्यावर आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. पण अजित पवार आले तर त्यांचेही स्वागत आहे. आमची काहीच अडचण नाही. अजित पवार मुख्यमंत्र्यांसारखाच आमचा जिल्हा सूतासारखा सरळ करतील. कारण, मी स्वतः त्यांच्या हाताखाली काम केले आहे. त्यांना वेड्यावाकड्या गोष्टी जमत नाहीत. ते स्पष्ट वक्ते आहेत.
मतदार टिकवून ठेवणे अजित पवारांच्या हातात
सुरेश धस यांनी यावेळी आपण अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक त्यांचा राजीनामा मागत असल्याचे ते म्हणाले. बीडमधील शरद पवारांचा मतदार अजित पवारांकडे वळला होता. पण अजितदादांनी या प्रकरणात ठोस निर्णय घेतला नाही तर त्यांना हा मतदार टिकवून ठेवता येणार नाही. पण त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार त्यांना चिकटून राहील हे येथील वास्तव आहे, असेही सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App