विशेष प्रतिनिधी
नागपूर: पोलिस अधिकाराच्या कानशिलात लगावणं शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चांगलंच महागात पडलं आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अखेर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. Harshvardhan Jadhav
६ डिसेंबर २०१४ रोजी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये आले होते. तिथल्या हॉटेल प्राईड मध्ये त्यांची पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरु होती. त्या बैठकीच्या वेळी, आत जाऊन उध्दव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला. त्यामुळे हॉटेल प्राईड येथे सुरक्षा बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्याशी वाद घालुन धक्काबुक्की केली. इतकंच नव्हे तर त्यांनी पराग जाधव यांना कानशिलात लगावल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जातो. याप्रकरणी, नागपूर येथील सोनेगाव पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर, बुधवारी जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. Harshvardhan Jadhav
हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची किंवा त्यांना शिक्षा सुनावण्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी २०११ साली सुद्धा अश्याच काहीश्या कारणामुळे जाधव यांना १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिस अधिकारी आणि जाधव यांच्यात हाणामारी झाली होती. त्यावरून जाधव यांच्याविरोधात पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी पूर्ण केला होता. यासंदर्भात येरुळे यांनी मार्च २०११ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने, हर्षवर्धन जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचार्यांवर हात उचलण्याच्या कलमांतर्गत दोषी धरले. या प्रकरणी त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु, त्यावेळी औरंगाबाद खंडपीठाने जाधव यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App