प्रतिनिधी
मुंबई : अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने गोड बातमी दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. सरकारकडून एसटी महामंडळाला मोठी मदत केली जाणार आहे. Good news for ST employees too; 378 crore assistance to ST Corporation during Diwali
एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आशा सेविकांची दिवाळी गोड
महाराष्ट्रात 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना 7000 रुपये, तर 3 हजार 664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ करण्यासह त्यांना प्रत्येकी 2000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.
आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यात 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत (Asha Sevika) ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात 7000 रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.
प्रवर्तकांनाही लाभ मिळणार
राज्यात 3664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज 6200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8775 रुपये मानधन मिळत असून, आता त्यांना 21175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2000 रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App