विशेष प्रतिनिधी
नाशिक : पवित्र गोदावरीच्या तीरावर आज श्रद्धा, करुणा आणि भक्तिभावाने ओथंबलेला एक अद्भुत क्षण साकार झाला. साडेतीनशेहून अधिक जैन माता-भगिनींच्या उपस्थितीत गोदावरी महाआरतीचा अलौकिक आणि भावस्पर्शी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परिसरात भक्ती, शांतता आणि राष्ट्रप्रेमाचा पवित्र सुवास दरवळत होता. Godavari maha aarti
कार्यक्रमाचा शुभारंभ नवकार महामंत्राच्या मंगल निनादाने झाला. त्या मंत्रस्वरांनी गोदावरीच्या लहरी जणू स्थिर झाल्या. त्यांच्या तरल प्रवाहातही मंत्रध्वनींचे स्पंदन झंकारू लागले. भगवान महावीर आणि सर्व तीर्थंकरांच्या जयघोषांनी तटावरील प्रत्येक मन भक्तिभावाने उजळले.
चार दिवसांपूर्वी समस्त जैन युवकांनी याच स्थळी महाआरतीचे आयोजन करून श्रद्धा, अनुशासन आणि भक्तीचा दीप प्रज्ज्वलित केला होता. आज त्या भक्तिदीपाची अखंड ज्योत जैन माता-भगिनींनी आपल्या करकमलांनी पुढे प्रज्वलित केली. प्रेम, मातृत्व आणि साधनेच्या तेजाने अधिक प्रखर बनवली.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने सौ. अशीमा केला, सौ. वीणा गायधनी, कु. सहाना, कु. गीताश्री व कु. स्वरा क्षेमकल्याणी यांनी सर्व जैन माता-भगिनींचे आत्मीय स्वागत आणि भावपूर्ण अभिनंदन केले. त्यांच्या स्नेहिल शब्दांनी संपूर्ण वातावरणात अनुराग आणि एकात्मतेचा मधुर भाव दाटून आला.
आरतीच्या शेवटी सर्व भगिनींनी एकचित्त होऊन राष्ट्राच्या कल्याणासाठी, समाजातील एकतेसाठी आणि माता गोदावरीच्या पावित्र्यासाठी प्रार्थना केली. त्या क्षणी संपूर्ण तटावर “अहिंसा परमो धर्मः” या संदेशाची तेजोमय प्रतिध्वनी घुमू लागली.
ही महाआरती फक्त एक धार्मिक विधी नव्हती, तर नारीशक्तीच्या श्रद्धा, संस्कार आणि साधनेचा तेजस्वी संगम होती. जणू मातृशक्तीनेच गोदावरीच्या लहरींवर भक्तीचा सुवर्णप्रकाश उजळविला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App