विशेष प्रतिनिधी
नाशिक : श्रीराम क्षेत्र नगरी नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या आरतीच्या वेळी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आंतरिक अनुभव येतो, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी रामतीर्थावरील गोदा आरतीचे कथन केले. हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरी आरती संपन्न झाली. त्यावेळी सहस्र नयनांनी तो अनुपम्य सोहळा अनुभवला. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या भव्यतेचे स्वरूप बघून स्वतः श्री श्री रविशंकर देखील भारावले.
जल पृथ्वी पर्वत यासारख्या निसर्गशक्तीची पूजा करण्याची भारतीयांची परंपरा आहे. सनातन वैदिक धर्माचा तो एक उत्तम अविष्कार आहे. निसर्गातल्या या घटकांची पूजा करताना ते निर्मळ राहतील, पवित्र राहतील, ते ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे सांगून श्री रविशंकर म्हणाले, रामतीर्थावरील गोदा आरतीचे भव्य स्वरूप पाहून नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आठवण येते. सनातन धर्म परंपरेत सर्व घटकांना सामावून घेण्याची शक्ती आहे. गोदा आरतीच्या या भव्य स्वरूपात देखील सर्व घटकांना सामावून घेतले यासारखे दुसरे समाधान नाही.
भारतात प्रयागराज, काशीमध्ये गंगा आरती केली जाते परंतु तेथे प्रामुख्याने पुरुष समाज घटक सहभागी होतो. परंतु, नाशिकमध्ये गोदावरी आरतीच्या उपक्रमात महिलांचाही अत्यंत उत्साहात सहभाग आनंददायी आहे, नाशिकने आपले वेगळेपण जपले आहे असे श्री श्री रविशंकर म्हणाले.
यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने श्री श्री रविशंकर यांचा चांदीचे अभिवादन पत्र देऊन सन्मान केला. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, राजेंद्र नाना फड, प्रफुल्ल संचेती, चिराग पाटील तसेच अन्य सदस्यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिविंगचे हजारो सदस्य उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App