विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त’ अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मायमराठीला दिलेल्या अभिजात भाषेचा बहुमानाच्या गौरवशाली निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.From Ovas to Theatre, the splendor of literature,
गावोगावी गायल्या गेलेल्या ओव्यांचा, वासुदेवाच्या रामप्रहरीचा, देवळातील आरती-कीर्तनांचा, संतपरंपरेचा, शाहीरांच्या पोवाड्यांचा, संत ज्ञानेश्वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा हा गौरव आहे. मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे आणि उद्याही अभिजात राहील, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी ही देशातील चौथी आणि जगातील 10 वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथसंपदेमुळे साहित्याची गोडी व संस्कार ही परंपरा मराठी माणसाने जपली आहे. देशातील सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठीत असून, ही अभिमानाची बाब आहे. दरवर्षी 200 पेक्षा जास्त साहित्य संमेलने मराठीत होत असून, प्रमाण भाषेपासून बोली भाषांसह विविध विचारांना व्यासपीठ देणारी मराठी ही एकमेव भाषा आहे. मराठी रंगभूमी ही समृद्ध असून, देशातल्या कुठल्याही भाषेपेक्षा ती अधिक प्रभावी ठरली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
डिजिटल युगात कोट्यवधी रुपयांच्या मराठी साहित्याची, पुस्तकांची विक्री आजही होते. साहित्यासोबतच आज देशामध्ये वेगवेगळ्या भाषांचे रंगभूमीवर आविष्कार होतात, त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात शिथिलता आलेली दिसते. पण मराठी रसिक आणि नाट्यकर्मींनी समृद्ध मराठी रंगभूमी जोपासली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
– मराठी दूत उपक्रम
डिजिटल युगात भाषेची बंधने कमी होत आहेत. केंद्र सरकारने ‘भाषिणी’ सारखे डिजिटल ॲप विकसित केले असून त्याद्वारे 14 भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने माहिती उपलब्ध करून देता येते. विचार हे आपल्याकडे आहेत, फक्त योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर आपण ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो. मराठीला युवापिढीशी जोडण्यासाठी ‘मराठी दूत’ उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हेमांगी अंक, रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील ‘मराठीची ये कौतुके’ पुस्तक, संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका यांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मराठी विभागाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित झाली असून, भविष्यात मार्गदर्शनासाठी आणखी पुस्तके प्रकाशित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
जेएनयू मध्ये मराठी भाषा अभ्यासक्रम
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने जेएनयू सारख्या विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. आता मराठी भाषा देशातील सर्व विद्यापीठांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. मराठी विभागाने केलेल्या उत्तम कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आभार मानले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, आमदार डॉ. मनिषा कायंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App