नाशिक : सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंवर फोकस; त्यांच्या मागे पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट!!, असे एक राजकीय चित्र आजच्या मुंबईतल्या सत्याच्या मोर्चातून पुढे आले. वास्तविक महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी मिळून सत्याचा मोर्चा काढला, पण त्याचे नेतृत्व ठाकरे बंधूंकडे आपोआप आले. कारण या मोर्चाला शरद पवार गैरहजर राहिले. त्यांनी सुरुवातीपासूनच सत्याच्या मोर्चाच्या तयारीच्या बैठकांपासून ते मोर्चापर्यंत ठाकरे बंधू आणि काँग्रेसच्या नेत्यांपासून विशिष्ट अंतर राखले. शरद पवारांनी आपले दुसऱ्या फळीतले नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे आदी नेत्यांना सत्याच्या मोर्चात पाठविले. Satyacha Morcha
काँग्रेसच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी सुद्धा सत्याच्या मोर्चा पासून विशिष्ट अंतरच राखले. निवडणूक आयोगाच्या भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राहिले, पण सत्याच्या मोर्चाच्या तयारीच्या बैठकांमध्ये हे नेते गेले नाहीत. त्यांनी नसीम खान आणि सचिन सावंत या तिसऱ्या पाळीतल्या नेत्यांना सत्याच्या मोर्चाच्या तयारीच्या बैठकीला पाठविले. स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तर ठाकरे बंधूंपासून शरद पवारांच्या पेक्षाही जास्त अंतर राखून राहिले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड या सगळ्यापासून फटकूनच राहिल्या. कारण काँग्रेसला मुदलातच मुंबई आणि मुंबई परिसरातल्या महापालिकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी ठाकरे बंधूंची आपले राजकीय संबंध जवळपास तोडून टाकल्यात जमा असल्याचे दाखवून दिले.
– मोर्चाचे सगळे वर्णन ठाकरे बंधूंच्याभोवती
मराठी माध्यमांनी महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाचे सगळे वर्णन ठाकरे बंधूंच्या भोवती केंद्रित केले. राज ठाकरे लोकलमधून निघाले उद्धव ठाकरे “मातोश्री मधून निघाले, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले, या बातम्यांवर त्यांनी फोकस केला. काँग्रेसचे कुठले नेते आले आणि कुठले नेते आले नाहीत, राष्ट्रवादीचे कुठले नेते केव्हा आले, याच्या बातम्यांवर फारसा फोकस केला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे थोडक्यात bites दाखवून मराठी माध्यमांनी त्यांची बोळवण केली. त्यामुळे सत्याचा मोर्चा आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या फक्त ठाकरे बंधू यांच्याच भोवती केंद्रित राहिल्या.
– राजच्या एका भूमिकेमुळे पवार + काँग्रेसची गोची
मतदार याद्यांचे शुद्धीकरण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेऊ नका. त्या निवडणुका आम्ही होऊच देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची राजकीय गोची झाली. कारण कुठल्याही निवडणुका लढविल्याशिवाय आणि कुठेही छोटे-मोठे सत्ता हस्तगत केल्याशिवाय त्यांच्या पक्षांचे अस्तित्वच टिकून राहत नाही. त्यांचे नेते आणि कार्यकर्ते लगेच सैरभैर होतात, हा धोका कायम शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊच देणार नाही. या भूमिकेला त्यांना पाठिंबा देता आला नाही. या राजकीय गोचीमुळे शरद पवार आणि काँग्रेसच्या पहिल्या पळीतल्या नेत्यांना ठाकरे बंधूंपासून विशिष्ट अंतर राखणे भाग पडले. पण मोर्च्यात सहभागी झालो नाही, तर आपला सत्ताधारी महायुतीला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, असे चित्र निर्माण होईल, या भीतीपोटी पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना सत्याच्या मोर्चात सामील व्हायला पाठवावे लागले. हे खरे या सत्याच्या मोर्चाचे राजकीय इंगित ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App