विशेष प्रतिनिधी
चऱ्होली, पिंपरी चिंचवड : एक हजार वर्षांच्या परकीय आक्रमणात अनेक राज्ये, मंदिरे आणि विद्यापीठे उध्वस्त झाली. परंतू, भारतीय जिवनमुल्यांचा आधार असलेल्या कुटुंब व्यवस्थेला आक्रमक हात लावू शकले नाहीत. आज मात्र आधुनिक युगात सर्व सुख सुविधा असतानाही भारतीय कुटुंबव्यवस्था डळमळीत होत असून, राष्ट्रहितासाठी ही धोक्याची घंटा आहे, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी दिला.
पिंपरी चिंवड येथील संघाच्या चऱ्होली नगराच्या वर्षप्रतिपदा उत्सवात ते बोलत होते. डूडूळगाव येथील संत सावतामाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश चोरडिया, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, नगर कार्यवाह नारायण बांगर उपस्थित होते.
कुटुंब टिकले तर राष्ट्र टिकेल, असे प्रतिपादन करताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, “नैतिक मुल्यांच्या आधारे उभी राहिलेली भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगातील सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे. संस्कार, संस्कृती, सेवाभाव आणि आत्मियता असलेले कुटुंबव्यवस्था राष्ट्रालाही सक्षम करते. आपल्या कुटुंबात ‘मातृ-पितृ देवो भव:’ या भावाचे आचरण व्हायला पाहिजे. आधुनिक युगात कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायला हवेत.” व्यक्तीगत आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासातून श्रेष्ठ भारत निर्माण होईल, असेही होसबाळे म्हणाले.
सतीश चोरडिया म्हणाले, “राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतुलनीय कार्य करत आहे. संघाचे निस्वार्थ राष्ट्रकार्य संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहे.” कार्यक्रमापूर्वी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी श्री अडबंगनाथ महाराज, श्री संत सावता माळी यांच्या मंदिरांचे दर्शन घेत परिसरातील कामाची माहिती घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App