विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली, तर अतिशय कडक कारवाई केली जाईल. तसेच, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.Fadnavis
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.Fadnavis
अंबादास दानवे यांच्या मते, या व्यवहारात अनेक शंका निर्माण करणारे मुद्दे आहेत. उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात सरकारमधील प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांवरही जोरदार टीका सुरू केली आहे.
या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी या व्यवहाराबाबत सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड आणि आयजीआर या विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, पण प्राथमिक अहवालानुसार काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितले की, आज पूर्ण माहिती आल्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल.
अनियमितता आढळली, तर दोषींवर कडक कारवाई
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कोणत्याही अनियमित व्यवहाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. आमच्या सरकारचे या विषयावर स्पष्ट मत आहे, कुठेही गैरप्रकार झाला असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात जर अनियमितता आढळली, तर दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या आरोपांना महत्त्व मिळाले असून, सरकार आता दबावाखाली आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही – पार्थ पवार
दरम्यान, पार्थ पवार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. एका वृत्तवाहिणीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही, किंवा कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. मात्र, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या भूमिकेमुळे प्रकरण अधिक गूढ झाले असून, राज्यात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत सरकारकडून मिळणारा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई यावर या वादाचे भवितव्य ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App