विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.Fadnavis
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. त्यांची या पदासाठी निवड जवळपास निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्यावर सरकार कुणापुढेही न झुकता विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असे स्पष्ट केले.
ठाकरेंच्या उपनेत्याने हिंदीची सक्ती असे लिहिले
फडणवीस म्हणाले, मी काय दोन भावांनी एकत्रित न येण्याचा जीआर काढला आहे काय? मी असा कोणताही जीआर काढला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, त्या अहवालात त्यांचा उजवा हात मानला जाणाऱ्या उपनेत्याने पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा असे लिहिले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले. त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू. महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला हाणला टोला
फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयी मोर्चावरही भाष्य केले. ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. फक्त राज ठाकरे यांनी पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची सक्ती करण्याचा निर्णय तुमच्या काळात का घेण्यात आला हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, टेनिस खेळावे, स्वीमिंग करावी, जेवण करावे आम्हाला काही अडचण नाही.
जनसुरक्षा विधेयकावरून उद्धव ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला केलेल्या विरोधाचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, हे दुटप्पी लोक आहेत. यांचे सत्तेतील रुप वेगळे असते व विरोधातील रुप वेगळे असते. खासगीत विचारले तर आणखी वेगळे रुप असते. त्यामुळे ते काय म्हणतात याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला, भारताच्या संविधानाला उत्तरदायी आहोत.
भारताच्या संविधानाचा कुणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कायदा तयार होईलच. हा कायदा केवळ त्यांच्याविरोधात आहे, जे भारताचे संविधान मानत नाहीत. जे भारतात अराजक माजवत आहेत. त्या अराजकवादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे. त्यांचा अराजकतेला पाठिंबा असेल, तर त्यांनी तसे स्पष्ट करावे. अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचे समर्थन करायचे. संविधान पायदळी तुडवणाऱ्यांच्या सोबत उभे राहायचे हे कुठेतरी बंद केले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेसने काही केले तरी तिची अवस्था तीच राहील
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीवरून काँग्रेसलाही टोला हाणला. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढली काय किंवा कुणासोबत मिळून लढली काय? हा प्रश्न नाही. परिणाम अगोदरच ठरलेला आहे. काँग्रेसने जनतेमध्ये जाणे सोडले आहे. जनतेच्या आशा, आकांक्षांपासून काँग्रेस तुटली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय सुरू आहे याची कल्पनाच नाही. ते एका अशा नंदनवनात बागडत असतात, ज्यात अजूनही ते ईव्हीएमच्या पलिकडे जात नाहीत. अजूनही ते निवडणूक आयोगाला दोष देत आपण हरल्याचे समर्थन करत असतात. त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जात नाहीत तोपर्यंत ते वेगळे लढो की स्वबळावर लढो त्याची अवस्था तीच राहील, असे फडणवीस म्हणाले.
भास्कर जाधवांचे नवे स्टेटस येईल – फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नाराजीवरही सूचक भाष्य केले. अलीकडच्या काळात ते कविता, शेरोशायरी माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचे नवीन स्टेटस येईल त्यावरून तुम्ही अंदाज बांधा, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App