विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला गरज नसताना देखील भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला ओढून घेतले. परंतु असे असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेची हाव संपत नाही. पालकमंत्री पदावरून त्यांची धुसफूस कायम असल्याचे चित्र समोर आले.
हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांना फडणवीस सरकारने पालकमंत्री पदावर नेमून देखील ते असमाधानी राहिले. त्यांनी आपले हे असमाधान माध्यमांकडे बोलून दाखवले. हसन मुश्रीफ वाशिम जिल्ह्यात रमेनात, अशा बातम्या आल्या. तर आपण गरीब असल्यामुळे आपल्याला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले, अशी तक्रार नरहरी झिरवळ यांनी केली. त्यांना फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री केले म्हणून ते नाराज झाले.
या नाराजीचा मुद्दा पत्रकारांनी पुण्यामध्ये अजित पवारांसमोर उपस्थित करताच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी किंवा काही समस्या असेल, तर ती सोडवायला अजित पवार समर्थ आहे. मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या दूर करीन. त्यांनी पत्रकारांकडे जाऊन आपल्या समस्या मांडू नयेत, असे त्यांना सांगेन, असे अजित पवार पुण्यात पत्रकारांना म्हणाले.
परंतु तरी देखील अजितदादा काय किंवा त्यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री काय हे “स्वयंभूपणे” सत्तेवर आलेले नाहीत. याची जाणीवच त्यांना भाजपने अजून करून दिलेली दिसत नाही. भाजपने अजितदादांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला घेतले म्हणून हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ हे मंत्री तरी बनू शकले. अन्यथा भाजपने त्यांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला घेतले नसते, तर पालकमंत्री पदावरून त्यांची नाराजी सोडाच त्यांना बिन खात्याचे सुद्धा मंत्री होता आले नसते. परंतु या सगळ्याची जाणीव भाजप करून देत नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची सत्तेची हाव अजून आटोक्यात आलेली दिसत नाही. त्यांची हाव आटोक्यात आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना कठोर भूमिका घेण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App