विशेष प्रतिनिधी
परभणी : Eknath Shinde शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.Eknath Shinde
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा करून, अतिवृष्टी अनुदानावरून महायुती सरकारला ‘दगाबाज’ संबोधले होते आणि मतदारांना त्यांना ‘वोटबंदी’ करण्याचे आवाहन केले होते. या आरोपांचा समाचार घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्यातील परभणी येथे आयोजित केलेल्या त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करताना, “नुसता फुकटचा ताठा अन् नाव उबाठा” असे म्हटले.Eknath Shinde
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. माझ्या हातात काही नाही, असे ते म्हणाले. पण जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती, तेव्हा तरी त्यांनी काही दिले होते का? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला दगाबाज म्हणता, पण खरी दगाबाजी कुणी केली? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी बांधली? हे जनतेने ओळखले आहे. म्हणूनच जनता आमच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
जालन्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात
जालना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आंबेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला. 39 वर्षे संघटनेत राहूनही जर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर पाठवले जात असेल, तर निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत आहे? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी साध्या नगरसेवकही नसताना सहा महिन्यांत राज्यसभेवर कशा गेल्या? या लोकांकडे कोणती जादू आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आम्ही लोकांच्या प्रश्नांवर काम करतो आणि गुन्हे दाखल करून घेतो, पण हे आयते आलेले लोक मोठे कसे होतात? असा खडा सवाल करत, कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, अशी स्पष्ट भूमिका आंबेकर यांनी मांडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App