प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मिस्टर बिन’ म्हणून केला. ‘मिस्टर बिन’नी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, पण आम्ही ती सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून विरोधकांवर टीकेची झोडही उठवली.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक दररोज सकारात्मक गोष्टींकडे, विकासाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. ते संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर नेहमीच गप्पा मारतात. पण आम्ही संविधानानुसार कारभार करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधकांना त्यांच्या सोईने संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण होते. पण मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना कुठे होते तुमच्या हातातील संविधान? प्रदीप मोरेला मारले तेव्हा संविधान कुठे होते? केतकी चितळेला तुरुंगात डांबले तेव्हा संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली, तेव्हा संविधान कुठे होते?
वाझे हा लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का?
हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडले तेव्हा संविधान कुठे होते? खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले तेव्हा कुठे होते संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होते संविधान? सचिन वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवले नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होते संविधान? फडतूस म्हणाले त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होते? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली.
हल्ली कुणीही येतो व संविधान दाखवतो
ते पुढे म्हणाले, जे आता सरकारवर संविधानाचा गळा घोटण्याचा आरोप करत आहेत, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. त्यांचे बरेच उद्योग आहेत. पण मी ते काढत नाहीत. ते बाहेर काढले तर त्यांना कोरे संविधान घेऊन पळ काढावा लागेल. आता हल्ली कुणीही येतो व संविधान दाखवतो.
बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले. त्यामुळे शिवसेना मोठी झाली. पण आता काहीजण मिस्टर बिन झालेत. ते सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजतात. त्यांच्या या वृत्तीमुळेच सर्वजण त्यांच्यापासून दूर गेले. कचऱ्यातून जी एनर्जी निर्माण झाली, त्याचा त्यांना हायव्होल्टेज शॉक बसला. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना डस्टबीनमध्ये (कचरापेटी) टाकली होती. आम्ही ती सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डस्टबीनमध्ये कोण बसले होते ते कुणी पाहिले नाही. पण बाहेर आल्यानंतर त्यांना घाम फुटल्याचे सर्वांनी पाहिले. त्यांना 3 ग्लास पाणी प्यावे लागले. चहा मागवावा लागला. चहा कुठला होता? वाघबकरी चहा. मला जास्त बोलायला लावू नका. बात निकली तो दूर तक जाएगी, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले नाही, पण त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता हे स्पष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App