नाशिक : महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले. सरकार स्थापन झाल्याच्या सुरुवातीलाच संतोष देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने “पवार संस्कारितांची” लक्तरे आधी बीडच्या रस्त्यावर लटकवली गेली आणि आता हुंडाबळीच्या मुळशी पॅटर्न वर ती येऊन लटकली. या दोन्ही ठिकाणी “पवार संस्कारितांचा” हिंस्र आणि घृणास्पद चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला. यात बदनामी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याची झाली आणि “पवार संस्कारितांची” लफडी निस्तरण्याची वेळ भाजपने स्वतःवर ओढवून घेतली. NCP leaders
एरवी शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणले. महिलांना आरक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले. त्यांनी आपल्या मुलीला मुलासारखेच वाढवले. मुलगा – मुलगी असा कधी भेद केला नाही, अशा “संस्काराच्या बाता” “पवार संस्कारित” नेते नेहमीच मारत आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आई-वडिलांच्या संस्काराची टिमकी नेहमीच वाजवली, पण खुद्द पवार संस्कारित अन्य नेत्यांनी या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवल्याचे बीड आणि मुळशी या दोन गावांमधून समोर आले. कारण पवारांनी केलेले संस्कार हे खरे जातिवाद आणि घराणेशाही पोसण्याचेच होते.
– धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड
बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या जोडगोळीने बराच काळ धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या मार्गांनी बचावाचे खूप प्रयत्न करून पाहिले. प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकरण फारच पेटल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडले. कारण या सगळ्यांमध्ये फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याला बदनामी सहन करावी लागली. ही बदनामी असह्य झाल्यानंतर फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला.
– वैष्णवी हगवणे प्रकरण
आता देखील वैष्णवी हगवणे प्रकरणात फडणवीसांच्या गृह खात्याच्याच बदनामीची मोहीम सुरू झाली. अजित पवारांचा निकटवर्ती आणि मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राजेंद्र हगवणे याने सुनेचा हुंडाबळी घेतला. हे प्रकरण फार वाढल्यानंतर तो पळून गेला. त्याचा मुलगा शशांक हगवणे आणि बाकीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली, पण राजेंद्र हगवणेला अजून हात लावला नाही. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके वेगवेगळ्या मार्गाला पाठविल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले, तरी राजेंद्र हगवणे हा अजून हाती लागला नाही. तो अजित पवारांचा निकटवर्ती असल्यामुळेच पोलीस त्याला हात लावत नाहीत, असा आरोप वैष्णवीचे वडील कस्पटे यांनी केला. या सगळ्यामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याचीच बदनामी सुरू झाली.
– दोन्ही प्रकरणांमधले आरोपी “पवार संस्कारितच”
वास्तविक संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी आणि वैष्णवी हगवणे प्रकरणातले आरोपी हे सगळे “पवार संस्कारितच.” पवारांच्या राष्ट्रवादीत वाढलेले. पवारांनीच भरण पोषण केलेले. पण मराठी माध्यमांनी या संदर्भात पवारांना कुठले प्रश्न विचारले नाहीत, की त्यांच्याकडून कुठले जाब विचारून घेतले नाहीत. सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. पवारांच्या संस्कारांची टिमकी वाजवणाऱ्या सुप्रिया सुळेंना या संदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण यावेळी त्या महाराष्ट्रात उपलब्धच नाहीत. पण म्हणून “पवार संस्कारितांची” हिणकस बाजू लपून राहिली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App