विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.Dhananjay Munde
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपरोक्त मागणी करत प्रस्तुत प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. ज्यांनी कुणी ही हत्या केली त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत, असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे. संतोष देशमुखही शेवटी माझ्याच जिल्ह्याचा सरपंच होता. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कुणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग ते कुणीही असो.
आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असला, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडायचे नाही ही माझी भूमिका आहे. पण त्यानंतरही केवळ राजकारणासाठी माझ्यावर काही जणांनी आरोप करणे, यामागे कोणते राजकारण असू शकते? हे आपण समजू शकता, असे ते म्हणाले.
वाल्मीक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे
पत्रकारांनी यावेळी बीडचे भाजप आमदार सुरेश धस व इतर स्थानिक आमदार या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव घेत असल्याची बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, वाल्मीक कराड हे माझ्या जवळचे आहेतच. पण त्यांची जवळीक सुरेश धस यांच्याशीही होती. वाल्मीक कराड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलिस करत आहेत. ही चौकशी अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजे. त्यामुळे शासन कुणालाही पाठिशी घालत नाही. मी एवढा मोठा कधी झालो हे मलाही माहिती नाही. पण एखाद्याचा दिवस सकाळी – सकाळी माझ्याविरोधात बोलल्याशिवाय उजाडत नसेल याहून अधिक मी काही बोलू शकत नाही.
माझी मीडिया ट्रायल सुरू
धनंजय मुंडे यांनी यावेळी मीडिया ट्रायलच्या माध्यमातून आपले नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, मीडिया ट्रायलच्या माध्यमातून या प्रकरणी माझे नाव खराब केले जात आहे. यासंबंधी अगदी मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या अगोदरपासून, मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कोणता मिळावा व कोणता मिळावा त्याची व त्यानंतर बीडचे पालकमंत्री कुणी व्हावे? यासंबंधी मीडिया ट्रायल केली गेली.
मी हे सर्व प्रकरण माझ्या पक्षाचे नेते अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवले आहे. राहिला प्रश्न चौकशीचा, तर ही चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे. विशेषतः हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शक्य तेवढ्या लवकर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे. तपासात ज्या काही गोष्टी निष्पन्न होत आहेत, त्या कोर्टाच्या निदर्शनास आणून हे प्रकरण एका तार्किक निष्कर्षापर्यंत नेले पाहिजे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App